दिग्रसमध्ये ईद उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:38 PM2017-12-02T23:38:54+5:302017-12-02T23:39:20+5:30

आपण एकीकडे नवीन संशोधन करून पृथ्वीला नंदनवन बनविण्यात व्यस्त आहोत, तर दुसरीकडे मानव जातीसमोर दररोज तेवढ्याच समस्या उभ्या ठाकत आहे.

Celebrate Eid in Digras | दिग्रसमध्ये ईद उत्साहात साजरी

दिग्रसमध्ये ईद उत्साहात साजरी

Next
ठळक मुद्देबाराभाई मोहल्ला चौकात सभा : काजी मौलाना अबू जफर यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : आपण एकीकडे नवीन संशोधन करून पृथ्वीला नंदनवन बनविण्यात व्यस्त आहोत, तर दुसरीकडे मानव जातीसमोर दररोज तेवढ्याच समस्या उभ्या ठाकत आहे. मात्र प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या शिकवणुकीत जगाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे निदान व उपचार आहे, असे प्रतिपादन काजी मौलाना अबू जफर यांनी केले.
दिग्रसमधील बाराभाई मोहल्ला येथे शनिवारी दुपारी ईद-ए-मिलादनिमित्त जमलेल्या विशाल जनसागराला उद्देशून ते बोलत होते. शहरातील विविध भागातून सकाळी अनेक मिरवणुका निघून त्याचे रूपांतर विशाल मिरवणुकीत झाले. मिरवणुकीत सहभागी मुस्लीम बांधव प्रेषित-स्तवन गात मुख्य मार्ग व चौकातून मार्गक्रमण करीत होते. दुपारी विशाल मिरवणुकीचे बाराभाई मोहल्ला येथे सभेत रूपांतर झाले. तेथे सामूहिक सलाम व फातेहा-ख्वानीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शहरातील विविध मशिदींचे इमाम मंचावर उपस्थित होते. विदर्भात प्रसिद्ध असलेल्या येथील ईद-ए-मिलादमुळे शहरातील मुख्य मार्ग व चौकांना मागील दहा दिवसांपासून आकर्षक कमानी व फरारे लावून सजविण्यात आले होते. शनिवारच्या मिरवणुकीत सहभागी मुस्लीम बांधवांसाठी शहरातील अनेक धार्मिक, सामाजिक व स्वयंसेवी संघटनांतर्फे शरबत, मिठाई, पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. नगरपरिषदेचे आरोग्य सभापती जावेद पहलवान व माजी उपनगराध्यक्ष जावेद पटेल यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले.
या मिरवणुकीत हिदू बांधवांसह विविध पक्षांचे पदाधिकारी व सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामू पवार, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, बांधकाम सभापती बालू जाधव, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखेडे, शहर प्रमुख संजय कुकडी, नगरसेवक केतन रत्नपारखी, रवींद्र अरगडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, प्रमोद बनगिनवार, गणेश भातुकले, पूनम पटेल, राहुल देशपांडे, संजय खंडरे, हर्षिल शाह, विनायक दुधे, तहसीलदार किशोर बागडे, ठाणेदार रामकृष्ण महल्ले, मुख्याधिकारी शेषराव टाले, राहुल शिंदे आदींसह सर्वधर्मीय बांधव सहभागी झाले होते.

Web Title: Celebrate Eid in Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.