भाजपावर रोष पण काँग्रेसही पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 09:42 PM2019-01-22T21:42:05+5:302019-01-22T21:42:44+5:30

केंद्रातील भाजपा सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सामान्य जनतेत निश्चितच रोष आहे. परंतु मतदारांच्या बोलण्यातून पर्याय म्हणून काँग्रेस कुठेही पुढे आलेली नाही. काँग्रेसने सामान्यांच्या घरातील ‘रॉकेल’ सारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांऐवजी ‘राफेल’वर दिलेला भर हे कारण त्या मागे आहे, असा रिपोर्ट इंटेलिजन्सने अलिकडेच उच्चस्तरावर सादर केल्याची माहिती आहे.

BJP is angry but Congress is not an option | भाजपावर रोष पण काँग्रेसही पर्याय नाही

भाजपावर रोष पण काँग्रेसही पर्याय नाही

Next
ठळक मुद्देइंटेलिजन्स रिपोर्ट : जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्रातील भाजपा सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सामान्य जनतेत निश्चितच रोष आहे. परंतु मतदारांच्या बोलण्यातून पर्याय म्हणून काँग्रेस कुठेही पुढे आलेली नाही. काँग्रेसने सामान्यांच्या घरातील ‘रॉकेल’ सारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांऐवजी ‘राफेल’वर दिलेला भर हे कारण त्या मागे आहे, असा रिपोर्ट इंटेलिजन्सने अलिकडेच उच्चस्तरावर सादर केल्याची माहिती आहे.
यवतमाळ जिल्ह्याशी तीन लोकसभा मतदारसंघ कनेक्ट आहेत. त्यात भावना गवळींचा यवतमाळ-वाशिम, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा चंद्रपूर-आर्णी आणि राजीव सातव यांचा हिंगोली या मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ या तीन लोकसभा मतदारसंघात विभागले गेले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने या तीनही मतदारसंघात सध्या यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या पक्षाची काय स्थिती आहे याबाबत इंटेलिजन्सने प्रत्यक्ष फिरुन सर्वेक्षण केले. त्याचा अहवालही सादर झाला.
भाजपा-मोदीविरोधात लाट व काँग्रेसला पोषक वातावरण असे सरसकट चित्र उभे केले जात असले तरी इंटेलिजन्सच्या सर्वेक्षणानुसार प्रत्यक्षात पूर्णत: तशी स्थिती नाही. मोदी व भाजपाविरोधात मतदारांमध्ये नाराजी आहे. परंतु त्यांच्यापुढे काँग्रेस हा पर्याय नाही. इंटेलिजन्सच्या सर्वेक्षकांकडून सामान्य मतदारांना भाजपा-मोदी नको तर पर्याय काय याची आवर्जुन विचारणा केली गेली. मात्र बहुतांश मतदारांच्या तोंडून पर्याय म्हणून काँग्रेसचे नाव पुढे आले नाही. यावरून भाजपा व मोदीविरोधातील वातावरण कॅश करण्यात काँग्रेस कमी पडल्याचे स्पष्ट होते.
इंटेलिजन्सच्या या रिपोर्टमध्ये बऱ्याचअंशी तथ्यांश आहे. कारण काँग्रेस सामान्य नागरिकांच्या जीवन मरणाशी संबंधित मुद्यांवर आक्रमक होताना दिसत नाही. सामान्यांना राफेल कराराशी काही देणे-घेणे नाही. त्यांच्या घरात चुल पेटवायला रॉकेल नाही हा मुद्दा महत्वाचा आहे. मात्र काँग्रेस रॉकेल ऐवजी राफेलवर जोर देत आहे. आजही तूर खरेदी हा शेतकºयांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय आहे. नाफेडचे खरेदी केंद्र सुरू नसल्याने पाच हजार ४५० रुपये प्रति क्ंिवटल हमी भाव असताना व्यापारी अवघ्या ४७०० ते ४८०० रुपयात तुरीची खरेदी करीत आहे. हमी दरापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी झाल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत. त्यातून बचाव करण्यासाठी शेतकºयांकडून आम्ही कमी भावात तूर विकण्यास तयार आहोत, असे व्यापारी लिहून घेत आहे. अशा संकटाच्या वेळी काँग्रेस शेतकरी व सामान्य नागरिकांच्या सोबत उभी राहिल्याचे दृश्य कुठेच नाही. स्थानिक पातळीवरील मुद्दे घेऊन सामान्य नागरिकांना अपिल होईल, असा कायमस्वरूपी आक्रमक लढा काँग्रेसकडून उभारला गेल्याचे गेल्या साडेचार वर्षात कधी दिसले नाही. कदाचित याच कारणावरून सामान्य नागरिकांना भाजपाविरोधात रोष असतानाही काँग्रेस सक्षम पर्याय वाटत नसावा, असे सर्वेक्षकांमध्ये मानले जात आहे.
काँग्रेस नेत्यांच्या निष्क्रियतेचे हे घ्या पुरावे
राजूरवाडी - घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी या गावात १० एप्रिल २०१८ ला शंकर रामभाऊ चायरे या शेतकºयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने तीन पानी पत्र लिहून जीवनयात्रा संपविली. या प्रकरणात सदर शेतकºयाची मुलगी जयश्री हिने घाटंजी पोलिसात तक्रार दाखल केली होती. आपल्या वडिलांच्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याने त्यांच्यावर भादंवि ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली गेली होती. त्यावेळी इंटेलिजन्सने पहाटे ३ वाजता उच्चस्तरावर रिपोर्ट पाठवून अलर्ट केले होते. तेव्हा प्रकरण गांभीर्याने घेण्याच्या सूचना सरकारला दिल्या गेल्या होत्या. हा मुद्दा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मात्र गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मुंबईहून या शेतकरी कुटुंबाच्या सांत्वनासाठी यावे लागले होते. त्यावेळी स्थानिक नेत्यांनी विखेंच्या या दौºयावर बहिष्कार घातला होता, हे विशेष. यावरून या नेत्यांना पक्षापेक्षा व्यक्ती महत्वाचे वाटल्याचे स्पष्ट होते.

टिटवी - घाटंजी तालुक्यातील टिटवी या गावात प्रकाश मानगावकर (४८) या शेतकºयाने १६ सप्टेंबर २०१७ ला सागवानाच्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव लिहून त्याच झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. मोदींमुळे आत्महत्या करीत असल्याच्या या एक नव्हे तर दोन घटनांनी मुंबई-दिल्लीपर्यंतचे सरकार-प्रशासन हादरले असताना काँग्रेस मात्र हा लोकल इश्यू कॅश करण्यात पूर्णत: अपयशी ठरली. मोदींच्या दाभडीतील ‘चाय पे चर्चा’वर दिल्लीपर्यंत गळे काढणारी काँग्रेसची मंडळी आपल्याच ‘गृह’मतदारसंघात मोदीच्या नावाने झालेल्या दोन शेतकरी आत्महत्यांवर गप्प का राहिली याचे ‘रहस्य’ अद्यापही कुणाला उलगडलेले नाही.

सावळेश्वर - पंतप्रधानांची फेलोशिप व मुख्यमंत्र्यांचे दत्तक गाव सावळेश्वर (ता. उमरखेड) येथे माधव शंकर रावते (७६) या शेतकऱ्याने १४ एप्रिल २०१८ ला स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. त्यावेळीसुद्धा काँग्रेसच्या दिल्ली-मुंबईशी कनेक्ट नेत्यांनी साधे या गावात तातडीने पोहोचण्याचेही सौजन्य दाखविले नाही.
बुथ एजंटांभोवती काँग्रेस गुरफटली
काँग्रेसची इच्छुक नेते मंडळी सध्या लग्न, बारसे, तेरवी, वाढदिवस अशा कार्यक्रमांना हजेरी लावण्यावर जोर देत आहे. शिवाय बुथ एजंटांवर भर देत आहे. त्याला मतदान कसे काढावे याचे मार्गदर्शन-प्रशिक्षण दिले जात आहे. वास्तविक गाव खेड्यांमध्ये मतदान काढणारी अनुभवाने प्रशिक्षित झालेली मंडळी आधीच असते. त्यांना नव्या प्रशिक्षणाची गरज नाही. उलट बुथ प्रमुख हा पक्षाने दिलेला असल्याने गावात त्याच्या विरोधात दुसरा गट सक्रिय होण्याची अधिक शक्यता असते. त्याऐवजी बुथ प्रमुख गावाने दिल्यास त्याला संपूर्ण गावाचे पाठबळ लाभते.

Web Title: BJP is angry but Congress is not an option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.