३० अवैध दारूविक्रेते निशाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:27 PM2018-06-29T23:27:09+5:302018-06-29T23:27:48+5:30

वारंवार कारवाई करूनही अवैध दारू विक्री बंद न करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध आता थेट एमपीडीए अंतर्गत कारागृहात किमान वर्षभरासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे.

30 illegal liquor buyers | ३० अवैध दारूविक्रेते निशाण्यावर

३० अवैध दारूविक्रेते निशाण्यावर

googlenewsNext
ठळक मुद्दे‘एमपीडीए’चा प्रस्ताव : जिल्ह्यातील शंभर सक्रिय गुंडांना तडीपार करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वारंवार कारवाई करूनही अवैध दारू विक्री बंद न करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध आता थेट एमपीडीए अंतर्गत कारागृहात किमान वर्षभरासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे जिल्हाभरातील ठाणेदारांची क्राईम मिटिंग घेतली. गुन्हेगारी, अवैध धंदे, संघटित टोळ्या, तस्करी, प्रलंबित गुन्हे, डिटेक्शनचे घटलेले प्रमाण अशा विविध मुद्यांवर ठाणेदारांकडून आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये सक्रिय गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर, अवैध दारू विक्रेते हे विषय प्रकर्षाने गाजले. पोलीस व एक्साईजकडून गावागावांतील दारू विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई केली जाते. या विक्रेत्यांविरुद्ध महिला व ग्रामीण जनता रस्त्यावर उतरते. त्यांचे मोर्चे एसपी कार्यालय, जिल्हा कचेरीवर धडकतात. मात्र त्यानंतरही अवैध दारूची निर्मिती व विक्री सुरूच राहते. अशा दारू विक्रेत्यांना वठणीवर आणण्यासाठी यापुढे एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ डेंजरस अ‍ॅक्टीव्हीटीज) अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत एमपीडीएसाठी जिल्ह्यातील ३० प्रमुख अवैध दारू विक्रेते निशाण्यावर आहेत. त्यांच्या प्रस्तावांवर अखेरचा हात फिरविला जात असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात समाजासाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या सुमारे १०० सक्रिय गुंडांना तडीपार केले जाणार आहे. त्यांचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत अन्य विविध मुद्यांवरही आढावा घेण्यात आला.
दारू माफियांवर कारवाई केव्हा ?
पोलीस अवैध दारू विक्रेत्यांवर एमपीडीए लावणार असली तरी यवतमाळातील दारूचे माफिया म्हणून ओळखले जाणारे म्होरक्यांवर एमपीडीए लावण्याची हिंमत पोलीस प्रशासन दाखविते का हे पाहणे महत्वाचे ठरते. बंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात राजरोसपणे दारू पोहोचविणारे हे माफिया सत्ताधारी पक्षाच्या आश्रयाला आहेत. त्यामुळेच पोलीस प्रशासन त्यांच्याबाबत सातत्याने बोटचेपी भूमिका घेताना दिसते. या उलट दारू विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करून मोठ्या ‘कामगिरी’चा देखावा निर्माण केला जातो.
महिला व बालकांची सुरक्षा सांभाळा-एसपी
महिला व बालकांवरील अत्याचारासंदर्भात सातत्याने जागरुक राहण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ठाणेदारांना दिले. यासंबंधी कायदेविषयक बाबींवर मार्गदर्शनही करण्यात आले.

Web Title: 30 illegal liquor buyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.