‘बोंडअळी’चे २१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 10:05 PM2018-07-26T22:05:51+5:302018-07-26T22:06:05+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वणी तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त झाला ....

21 million of 'Bondly' | ‘बोंडअळी’चे २१ कोटी

‘बोंडअळी’चे २१ कोटी

Next
ठळक मुद्देमदत निधी : १५ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वणी तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त झाला असून येत्या आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्यांना या निधीचे वाटप केले जाणार आहे.
शासनाने बोंडअळीग्रस्तांसाठी मदत जाहीर केल्यानंतर सदर मदत दोन टप्प्यात मिळणार होती. त्यानुसार वणी तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात १३ कोटी ८० लाख ७१ हजार २११ रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधी तालुक्यातील ९२ गावांतील १३ हजार ५८५ शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार ७०० रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत वितरीत करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील निधी वितरीत झाल्यानंतर तालुक्यातील ७३ गावांतील १४ हजार ७३० बोंडअळीग्रस्त शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा होती. मात्र बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील २० कोटी ७१ लाख १४ हजार २४८ रुपयांचा निधी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.
निधी प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाने तपासणी सुरू केली आहे.
शासनाने जाहीर केल्याप्रमाणे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना पुन्हा लाभ मिळू नये, याची खबरदारी महसूल विभागाकडून घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली, त्या शेतकऱ्यांची नावे दुसऱ्या टप्प्यातील यादीत आहे काय, याची तपासणी महसूल विभागाकडून केली जात आहे. या तपासणीनंतर लाभार्थ्यांची यादी तयार करून ती बँकेकडे धनादेशासह दिली जाणार आहे. त्यानंतर मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
मागील वर्षी पिकांना पोषक असा पाऊस झाल्याने कपाशीचे पीक जोमात वाढले. चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा असताना अचानक कपाशीवर बोंडअळीचा हल्ला झाला. बोंडअळीच्या उद्रेकाने हजारो हेक्टरवरील कपाशी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवे प्रयोग केले. वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या केल्या. त्यातून विषबाधेसारख्या जीवघेण्या घटना घडल्या. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदा शेतकऱ्यांवर असे संकट कोसळले.
वणी विभागात अतिपावसाने शेतकऱ्यांचे नुकसान
यंदा पावसाने कहर केला आहे. गेल्या १५ दिवसांपासून या भागात सातत्याने पाऊस सुरू आहे. सूर्यदर्शन अभावानेच होत आहे. या वातावरणाचा परिणाम शेती पिकावर होत आहे. सततच्या पावसाने शेतात कचरा झाला असून तो काढण्यासाठीही पाऊस उसंत देत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. अतिपावसामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: 21 million of 'Bondly'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.