पाणीटंचाई उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 02:53 PM2019-04-15T14:53:05+5:302019-04-15T14:53:11+5:30

‘लोकमत’च्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेऊन प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती दिली आहे.

measures to avoid water scarcity implimented in Washim | पाणीटंचाई उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती!

पाणीटंचाई उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने ‘लोकमत’ने विविधांगी वृत्त प्रकाशित करून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, ‘लोकमत’च्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेऊन प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती दिली आहे. त्यानुषंगाने विहिरींचे अधिग्रहण आणि अतीटंचाईग्रस्त गावांना विनाविलंब टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात उद्भवणारी पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ५९ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केलेला आहे. याअंतर्गत जून २०१९ पर्यंत ५०४ गावांसाठी ४८१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ८ गावांमध्ये विंधन विहीर दुरुस्ती, ४ गावांमध्ये तात्पुरती नळ योजना, ३६ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा, तर ४३३ गावांमध्ये विहिर अधीग्रहणाच्या उपाययोजनांचा समावेश आहे.
असे असले तरी जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू प्रकल्पांची पाणीपातळी कमालीची खालावल्याने तथा गावागावांमधील जलस्त्रोत कोरडे पडू लागल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होवूनही अधिकांश गावांमध्ये डिसेंबर २०१८ मध्ये तयार झालेल्या पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासनाने दिरंगाईचे धोरण अवलंबिले होते. ११ एप्रिल रोजी पार पडलेल्या वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या कामात प्रशासकीय यंत्रणा गुंतल्यानेही पाणीटंचाईच्या मुद्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. परिणामी, सर्वच तालुक्यांमधील टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट व्हायला लागली. ही बाब ‘लोकमत’ने ८ ते १२ एप्रिलदरम्यान प्रकाशित केलेली पाच भागांची वृत्तमालिका आणि १४ एप्रिलच्या अंकात ‘खैरखेड्यात पेटली पाणीटंचाई!’, या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्तामधून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची तडकाफडकी दखल घेत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावरून सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची यादी तत्काळ सादर करण्याचे फर्मान सोडले आहे. तसेच विहिर अधिग्रहण, टँकर, नळयोजना दुरूस्ती यासह अन्य उपाययोजना विनाविलंब राबविण्यात याव्या, अशाही सूचना देण्यात आल्या असून अनेक उपाययोजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस गती देण्यात आली आहे.


जिल्ह्यातील गावांमध्ये उद्भवणाºया पाणीटंचाईवर प्रभावीरित्या मात करण्यासाठी ४ कोटी ५९ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी केली जात आहे. तालुकास्तरावरून तहसीलदारांमार्फत पाणीटंचाई निवारणार्थ विहिर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना योजना, टँकरने पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजनांचे प्रस्ताव प्राप्त होताच तत्काळ अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुषंगाने २७ गावांमध्ये ३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून टँकरही सुरू झाले आहेत.
- ह्रषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: measures to avoid water scarcity implimented in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.