‘मार्च एन्डिंग’ची धांदलघाई; ४८८ कोटींची बिले निकाली!

By सुनील काकडे | Published: March 30, 2024 06:14 PM2024-03-30T18:14:03+5:302024-03-30T18:14:51+5:30

विविध प्रशासकीय यंत्रणांकडून आतापर्यंत ५०९ कोटी रुपयांची ४३२४ बिले कोषागारात सादर करण्यात आली.

'March Ending'; Bills of 488 crore settled in washim | ‘मार्च एन्डिंग’ची धांदलघाई; ४८८ कोटींची बिले निकाली!

‘मार्च एन्डिंग’ची धांदलघाई; ४८८ कोटींची बिले निकाली!

वाशिम : प्रत्येकवर्षी ३१ मार्च रोजी जुने वित्तीय वर्ष संपून १ एप्रिलपासून नवे वित्तीय वर्ष सुरू होते. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध स्वरूपातील कामांसाठी राखून ठेवला जाणारा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावा लागतो. त्यानुसार, मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मोठी धांदलघाई सुरू झाली. विविध प्रशासकीय यंत्रणांकडून आतापर्यंत ५०९ कोटी रुपयांची ४३२४ बिले कोषागारात सादर करण्यात आली. त्यापैकी ४८८ कोटी रुपयांची ४१७२ बिले निकाली काढण्यात आली; तर २९ मार्चअखेर २१ कोटी रुपयांची १५२ बिले ‘पेन्डींग’ असल्याची माहिती प्राप्त झाली.

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागाच्या विकासात जिल्हा नियोजन समितीची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी व लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो. यामाध्यमातून विविध विकासकामे करताना भौतिक सुविधा निर्माण करण्यासोबतच विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यात येते.

दरम्यान, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांत जिल्हा वार्षिक योजनेसाठी सर्व यंत्रणा मिळून ३११ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर होता. त्यात सर्वसाधारण योजनेत २३५ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ६६ कोटी आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत १० कोटी रुपयांच्या निधीचा समावेश होता. या निधीतून करण्यात आलेल्या कामांसह अन्य यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कामांची सर्व बिले मार्च महिन्यात कोषागारात सादर करण्यात आली. कोषागार यंत्रणेकडूनही दिवसरात्र परिश्रम घेवून ४८८ कोटींची बिले निकाली काढण्यात आली आहेत.

३१ मार्चला रात्री १२ वाजेपर्यंत चालणार काम
प्रशासकीय यंत्रणांना त्यांच्याकडील खर्चाची बिले सादर करण्यासाठी ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या वेळेपर्यंत जिल्हा कोषागार कार्यालयाकडे बिले सादर करण्यात यावी, असे कळविण्यात आले.

२९ मार्चअखेरचा लेखाजोखा
कोषागारात सादर झालेली बिले - ४,१७२
बिलांची रक्कम - ४८८ कोटी ७६ लाख २९ हजार
‘पेन्डींग’ बिले - १५२
बिलांची रक्कम - २१ कोटी ११ लाख ८७ हजार

‘सीएमपी’द्वारे प्रदान बिले - २,९२८
बिलांची रक्कम - ३१२ कोटी ३३ लाख ६३ हजार
‘ई-कुबेर’द्वारे प्रदान बिले - १,२४४
बिलांची रक्कम - १७६ कोटी ४२ लाख ६६ हजार

१ ते २९ मार्च या कालावधीत विविध प्रशासकीय यंत्रणांकडून खर्चाची बिले जिल्हा कोषागार कार्यालयाकडे पाठविण्यात झाली. २९ मार्चअखेर त्यातील ४८८ कोटींपेक्षा अधिक रकमेची ४,१७२ बिले निकाली काढण्यात आली आहेत. १५२ बिले पेन्डींग असून ३० व ३१ मार्चलाही सादर होणारी बिलांच्या फाईल्सचा निपटारा वेळेत केला जाईल.
- विजय जवंजाळ, जिल्हा कोषागार अधिकारी, वाशिम

Web Title: 'March Ending'; Bills of 488 crore settled in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम