‘रोहयो’च्या कामांकडे मजुरांनी फिरवली पाठ!

By admin | Published: May 24, 2017 01:49 AM2017-05-24T01:49:07+5:302017-05-24T01:49:07+5:30

प्रशासन हतबल : एक लाखापैकी १७ हजार मजूर कार्यरत

Laborers read the text of Roho's work! | ‘रोहयो’च्या कामांकडे मजुरांनी फिरवली पाठ!

‘रोहयो’च्या कामांकडे मजुरांनी फिरवली पाठ!

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केवळ २०१ रुपये दैनंदिन मजूरीत गुंतून राहण्यापेक्षा खासगीत इमारत बांधकामात दिवसाला ३०० रुपयांपेक्षा अधिक मजूरी मिळते. याशिवाय दररोज पैसा हाती पडतो, या मानसिकतेमुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर यायला मजूर तयार नाहीत. परिणामी, प्रशासनामार्फत हाती घेण्यात आलेली असंख्य कामे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात १० हजार ६१४, मालेगाव १५ हजार ५४३, मंगरूळपीर २७ हजार १०३, मानोरा १४ हजार ५१०, रिसोड २२ हजार ७१० आणि वाशिम तालुक्यात १२ हजार ९४७, असे एकंदरित १ लाख ३ हजार नोंदणीकृत जॉबकार्डधारक मजूर आहेत. असे असले तरी सद्या सिंचन विहिर, वृक्षलागवड, रोपवाटिका, शौचालय, शोषखड्डे, घरकुलांच्या सुरू असलेल्या एकंदरित १३२५ कामांवर त्यापैकी केवळ १७ हजार ५३६ मजूरच कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मजूरांकडून कामांची मागणीच नसल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे.
म्हणायला, शासनाने १ एप्रिलपासून मजूरांच्या मजूरीत ९ रुपये वाढ केली आहे. जॉबकार्डधारक मजूरांना पूर्वी १९२ रुपये प्रतिदिन मजूरी दिली जायची. त्यात ९ रुपयांची वाढ करित शासनाने १ एप्रिल २०१७ पासून दैनंदिन मजूरी २०१ रुपये केली आहे. मात्र, ती देखील तुलनेने कमी असल्याने मजूरांकडून ‘रोहयो’कडे कामांची मागणीच केली जात नसल्याची वस्तूस्थिती आहे.

खात्यात पैसे जमा करण्याच्या पद्धतीबाबत नाराजी!
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या मजूरांना कुटूंबाचा उदरनिर्वाह करित असताना दोनवेळच्या जेवणाची देखील भ्रांत पडते. त्यामुळे दिवसभर काम केल्यानंतर त्याचा मोबदला सायंकाळी हातात पडायला हवा, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, ‘रोहयो’अंतर्गत मजूरीचे पैसे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्याची पद्धत १ एप्रिल २०१७ पासून अंगिकारण्यात आली असून हा पैसा बँकेतून ‘विड्रॉल’ करणे जिकीरीचे ठरत असल्याने या किचकट पद्धतीबाबत मजूरांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असंख्य कामे मंजूर आहेत. कामांची मागणी झाल्यानंतर तत्काळ मजूरांना काम देखील उपलब्ध करून दिले जाते. मात्र, वारंवार आवाहन करूनही ही कामे करण्याकरिता मजूर उपलब्ध होत नसल्याने सिंचन विहिर, पांदन रस्ते यासह इतरही कामे प्रलंबित राहत आहेत.
- सुनील कोरडे
उपजिल्हाधिकारी, रोहयो, वाशिम

Web Title: Laborers read the text of Roho's work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.