Koregaon Bhima; Stop the road at Washim, close the road | कोरेगाव भीमा ; वाशिम येथे कडकडीत बंद, ठिकठिकाणी रास्ता रोको

ठळक मुद्देशहरातील चौकांना पोलीस छावणीचे स्वरुप दिसून येत आहे. नागपूर -औरंगाबाद दृतगती मार्गावर शांततेत रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले.मानोरा येथे युवकांनी रॅली काढून घटनेचा निषेध नोंदविला.

वाशिम: भीमा कोरेगाव येथील दगडफेक घटनेचे पडसाद मंगळवारी वाशिम जिल्ह्यातही उमटले असून,बुधवारी सकाळपासून जिल्हयात सर्वत्र बंद पाळण्यात येत आहे. वाशिम येथील बसस्थानकामध्ये सर्वत्र शुकशुकाट असून रस्त्यांवरील गर्दीही कमी झालेली दिसून आली. शहरातील चौकांना पोलीस छावणीचे स्वरुप दिसून येत आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार चौकातील नागपूर -औरंगाबाद दृतगती मार्गावर शांततेत रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असली तरी बुधवार हा बाजाराचा दिवस असल्याने आठवडी बाजार सुरळीत सुरु दिसून येत आहे. परंतु सर्वच मार्गावरील वाहने बंद असल्याने बाजारात पाहिजे त्या प्रमाणात गर्दी दिसून येत नाही. कारंजा येथे कडकडीत बंद पाळण्यात येत असून सर्व प्रतिष्ठाने बंद दिसून येत आहेत.

मानोरा येथे युवकांनी रॅली काढून घटनेचा निषेध नोंदविला. येथे युवकांनी मुख्य चौकात टायर जाळलेत.  शिरपूर येथे बाळासाहेब आंबेंडकर यांच्या अनुयायांनी शांततेत रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. मालेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात येत असून दुकानदारांनी आपली दुकाने न उघडल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. वाशिम येथील चित्रपट गृहे आज बंद ठेवण्यात आली आहेत.