ग्रामीण भागात आकोडे टाकून वीजचोरी

By admin | Published: January 21, 2015 01:29 AM2015-01-21T01:29:04+5:302015-01-21T01:29:04+5:30

लोकमत स्टिंगने फोडले बिंग ;उघड्या तारांतून होत असलेल्या चोरीमुळे जनतेच्या जिवास धोका.

Electricity disconnect from rural areas | ग्रामीण भागात आकोडे टाकून वीजचोरी

ग्रामीण भागात आकोडे टाकून वीजचोरी

Next

वाशिम: महावितरण कंपनीला अंधारात ठेवून परस्पर सर्व्हिस लाईन टाकून वीज चोरी करण्याचे प्रकार सुरू असल्याचे लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले . कारंजा तालुक्यातील इंझोरी, कामरगाव तर मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे वीज चोरीचा प्रकार सर्रास दिसून येत आहे.
वाशिम जिल्हय़ात होत असलेल्या वीज चोरीबाबत लोकमत चमूच्यावतीने स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यामध्ये कित्येक ठिकाणच्या शेतशिवारात वीज चोरी करून महावितरणला लाखो रुपयांचा चुना लावल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वीज चोरीने मात्र नियमित विजेचे बिल भरणार्‍यांवर भुर्दंड बसत आहे.
महावितरण कंपनीची फसवणूक करून परस्पर वीज जोडणी केल्या जाते, त्याशिवाय मीटर असतानाही त्याला बायपास करून थेट विजेचा वापर करणे, असे प्रकार नवीन नाहीत. यापूर्वी कित्येकदा वीज चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून, वीज चोरी उघडकीस आणण्यासाठी वीज वितरणकडून अनेकदा मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शेकडो जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंडही कंपनीने वसूल केला आहे. वीज चोरी हा कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आला असून, यासंदर्भात दोषी आढळणार्‍यावर कारवाई करण्याची, त्याला दंड ठोठावण्याची तरतूद आहे.
वीज चोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भात त्यांच्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून वीज चोरी उघडकीस आणून देणार्‍यास रोख बक्षीसही देण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. ह्यवीज चोरी कळवा आणि लाखो रूपये मिळवाह्ण, असे घोषवाक्य वीज वितरणने त्यांच्या संकेत स्थळावर टाकले आहे. तथापि, त्याचा फारसा परिणाम झालेला नसल्याचे दिसत आहे.
शेतशिवारात अधिकृत वीज जोडणी नसतानाही विजेच्या खांबावर थेट तार टाकून वीज चोरी करण्यात येते. या वीज चोरीमुळे महावितरणला लाखोंचा चुना लावला जातोच, शिवाय विजेचा दाब कमी होऊन रोहित्र जळण्याच्या घटनाही घडतात.
याशिवाय वीज चोरी करण्याच्या प्रयत्नांत काहींनी आपले प्राणही गमावण्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. असे असले तरी, वीज चोरांवर कोणताही परिणाम होत नसून, त्यांच्याकडून वीज खांबावर तार टाकून पिकांना पाणी देण्यासाठी वीज चोरी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. वीज चोरी ही शेतात पाण्याची सोय असलेल्यांकडून होण्याचे प्रकार फारसे नाहीत; परंतु जलप्रकल्प, तलाव, धरणे, बंधार्‍यांच्या जवळच असलेल्या शेतशिवारात असे प्रकार प्रामुख्याने होत असल्याचे लोकमतच्या चमूकडून करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. वीज चोरी मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे त्याचे परिणाम नियमित ग्राहकांवर झाले आहेत. अधिकृत जोडणी घेऊन रितसर बिलभरणा करणार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
वाशिम जिल्हय़ातील वीज चोरीच्या घटना पाहता २0 जानेवारी रोजीच जिल्हय़ातील सर्व कनिष्ठ अभियंत्यांची बैठक घेऊन वीज चोरीप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिन्यातून किमान १0 केसेस दाखल करण्याचे उद्दिष्ट्य यावेळी देण्यात आले असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता एस.के. झळके यांनी स्पष्ट केले.

Web Title: Electricity disconnect from rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.