वाशिमच्या भुगर्भातील रहस्यांचा उलगडा झालाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 04:10 PM2019-04-30T16:10:49+5:302019-04-30T16:10:54+5:30

वाशिम : एकेकाळी राजे वाकाटक यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम शहरातील भुगर्भात अनेक रहस्य दडलेले आहेत.

Due to half excavattion the secrets of the land of Washim not revail | वाशिमच्या भुगर्भातील रहस्यांचा उलगडा झालाच नाही!

वाशिमच्या भुगर्भातील रहस्यांचा उलगडा झालाच नाही!

Next

- सुनील काकडे ।
वाशिम : एकेकाळी राजे वाकाटक यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम शहरातील भुगर्भात अनेक रहस्य दडलेले आहेत. १९९४, ९५ आणि २००५ मध्ये तीनठिकाणी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या उत्खननामध्ये आढळलेली जुनी बांधकामे, अवशेष, रजत आणि ताम्र नाणी आदींवरून त्यास पुष्टी देखील मिळाली. मात्र, अर्धवट स्थितीत झालेल्या या उत्खननामुळे या रहस्यांचा पूर्ण उलगडा झाला नाही. तेव्हापासून २४ वर्षे उलटूनही पुरातत्व विभागाने या रहस्यांवरील पडदा हटविण्यासाठी कुठलेच ठोस प्रयत्न देखील केले नाहीत.
विविध स्वरूपातील ऐतिहासिक, पौराणिक अख्यायिका लाभलेल्या वाशिम शहरातील दक्षिण दिशेला असलेल्या लालटेकडी परिसरात पुरातत्व विभागाकडून सन १९९४ आणि १९९५ अशा दोन टप्प्यात उत्खनन करण्यात आले होते. या उत्खननात तिसºया क्षत्रपांची ५१ नाणी, २५१ रजत मुद्रा आढळल्या होत्या. याशिवाय जुन्या पद्धतीच्या विटांचे आखीव-रेखीव निवासस्थान, भगवान महाविर तिर्थंकर यांच्या मुर्तीचे ३४ बाय २३ बाय १५ सेंटीमिटर आकाराचा शिर्षभाग, बेसाल्ट दगडापासून तयार करण्यात आलेली स्त्री मुर्ती देखील या उत्खननादरम्यान बाहेर काढण्यात आली. मात्र, पुरेशा निधीअभावी पुरातत्व विभागाला पुढचे उत्खनन करण्यात अडचणी निर्माण झाल्याने २४ वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेले हे काम पुन्हा हाती घेण्यात आले नाही.
याचदरम्यानच्या काळात सन १९९५ मध्ये पुरातत्व विभागाने वाशिम शहरातील गवळीपूरा भागातील चामुंडादेवी मंदिर परिसरात उत्खननाचे काम हाती घेतले.
त्यातही तळातील बांधकाम, मानवी सांगाडे, ताम्र नाणी आदी बाबी आढळून आल्या होत्या. हे उत्खननही पुरातत्व विभागाने अर्धवट अवस्थेतच सोडून दिले, जे आजतागायत पुन्हा हाती घेण्यात आलेले नाही. त्यानंतर सन २००५ मध्ये पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या व्याघ्रेश्वर टेकडी परिसरातही पुरातत्व विभागाने उत्खनन केले.
अनेक दिवस चाललेल्या या उत्खननादरम्यान भल्यामोठ्या महालसदृष वास्तूची तटबंदी आढळून आली होती. यासह १.२५ मीटर जाडी व २० मीटर रुंद भिंतीचा भाग आढळला. ज्याचे पश्चिम दिशेला १७; तर पुर्वेकडे ११ थर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले होते.
या भिंतीखाली पुन्हा दगडाचे थर देखील पुरातत्व विभागाला आढळले. पांढºया मातीसोबतच मृद भांडी देखील या उत्खननातून बाहेर आली होती. तथापि, हे काम सलग सुरू राहिले असते तर व्याघ्रटेकडी परिसरातील भुगर्भाच्या खाली दडलेल्या अनेक रहस्यांचा शोध लागणे शक्य झाले असते. मात्र, राज्यशासनाकडून मंजूर निधी आणि कामांसाठी लागणाºया पैशांचा मेळ बसविणे पुरातत्व विभागाला अशक्य झाल्याने आधीच्या दोन उत्खननाप्रमाणेच व्याघ्रटेकडी परिसरातील उत्खननही अर्धवट स्थितीत बंद करण्यात आले. तथापि, सन २००५ पासून आजतागायत ते पुन्हा सुरू व्हावे, याकडे विद्यमान लोकप्रतिनिधी अथवा जिल्हा प्रशासनानेही लक्ष पुरविले नाही. त्यामुळे हा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.

केंद्र शासनाकडून वाढीव निधी मिळविण्यासाठी प्रयत्न अपुरे!

महाराष्ट्रात कुठेही पुरातत्व विभागाकडून केल्या जाणाºया उत्खननासाठी राज्यशासनाकडून मंजूर होणाºया निधीचे प्रमाण तुलनेने फारच अल्प आहे. त्यामुळेच वाशिम शहरातील व्याघेश्वर टेकडी परिसर, चामुंडादेवी मंदिर परिसर आणि लालटेकडी भाग या तीनठिकाणी झालेले उत्खनन अर्धवट अवस्थेत बंद पडले. केंद्रशासनाकडे वाढीव निधी मंजूर करण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न झाले असते तर कदाचित हा प्रश्न मार्गी लागला असता. यायोगे पुढचे उत्खनन शक्य झाले असते. मात्र, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत कुठलाच पुढाकार घेतला नसल्याचा सूर जाणकारांमधून उमटत आहे.


भुगर्भात दडलेल्या ऐतिहासिक, पौराणिक तथा प्राचीन अवशेषांसंबंधी नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी वाशिम शहरात अर्धवट अवस्थेत बंद पडलेली तीनही ठिकाणची उत्खननाची कामे पुन्हा सुरू करण्याबाबत शासनाकडे निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. राज्यशासन, केंद्रशासनाकडून या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून घेण्यासाठीही जिल्हा प्रशासनाकडून पत्रव्यवहार केला जाईल.
- ऋषीकेश मोडक
जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Due to half excavattion the secrets of the land of Washim not revail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.