मृतक शेतकर्‍याच्या घरासमोरच लोकप्रतिनिधींचे धरणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:27 AM2018-02-06T01:27:23+5:302018-02-06T01:28:45+5:30

वाशिम: येथून जवळच असलेल्या वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून ४ फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ घेऊन ११ जिल्हय़ांमध्ये भ्रमंती करणारे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी ५ फेब्रुवारीला मृतक शेतकर्‍याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन शासनाच्या निषेधार्थ तेथेच धरणे आंदोलन केले.

Demonstration against the dead farmer's house! | मृतक शेतकर्‍याच्या घरासमोरच लोकप्रतिनिधींचे धरणे!

मृतक शेतकर्‍याच्या घरासमोरच लोकप्रतिनिधींचे धरणे!

Next
ठळक मुद्देआमदार डॉ. देशमुख यांची शासनावर टीका विदर्भातील विविध प्रलंबित प्रश्नांवर झाले मंथन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: येथून जवळच असलेल्या वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून ४ फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ घेऊन ११ जिल्हय़ांमध्ये भ्रमंती करणारे काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी ५ फेब्रुवारीला मृतक शेतकर्‍याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन शासनाच्या निषेधार्थ तेथेच धरणे आंदोलन केले.
विदर्भाची सद्य:स्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्‍यांचे विविध प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद यासह इतर प्रश्नांवर विदर्भातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढली असून, ७ जानेवारीपासून निघालेली ही यात्रा १३ फेब्रुवारीपर्यंत विदर्भातील ६२ मतदारसंघांमधून भ्रमंती करणार आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारीला आमदार डॉ. देशमुख यांनी वाघळुद येथील शेतकरी किसन मस्के यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. केवळ १0 हजारांच्या कर्जासाठी किसन मस्के यांना आत्महत्या करावी लागली, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून त्यांनी शासनच्या धोरणावर कडाडून टीका केली. याप्रसंगी आमदार अमित झनक यांच्यासह अँड. किरण सरनाईक, जुगल कोठारी, दत्तराव धांडे, सरपंच कृष्णा देशमुख, तहसीलदार राजेश वजिरे उपस्थित होते. 
तत्पूर्वी, विदर्भ आत्मबळ यात्रेसोबत आलेल्या डॉ. देशमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काही वेळ धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, की कापूस, सोयाबीन यासारख्या खरीप पिकांना दीडपटीने मिळणारा हमीभाव काय राहील, हे राज्य सरकारने जाहीर करावे, निव्वळ घोषणाबाजी करून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही. त्यामुळे शासनाने ठोस धोरण जाहीर करणे अपेक्षित आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. सोयाबीनवरील लाल्या आणि कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव शेतकर्‍यांना त्रस्त करून सोडत आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी अत्यल्प निधी मिळतो, म्हणूनच सिंचनाचा अनुशेष वाढत आहे. शेतीला पुरेशी वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. हे सर्व प्रश्न कसे सुटतील, याचे उत्तर शासनाने द्यायला हवे, असे ते म्हणाले. 

Web Title: Demonstration against the dead farmer's house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.