मंगरुळपीर तालुक्यातील संगणक परिचालक ११ महिन्यांपासून मानधनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 04:11 PM2018-02-17T16:11:10+5:302018-02-17T16:14:10+5:30

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या  संगणक परिचालकांना गेल्या ११ महिन्यांपासून हक्काचे मानधन मिळालेले नाही.

Computer operators in Mangrolpir taluka not get sallary from 11 months | मंगरुळपीर तालुक्यातील संगणक परिचालक ११ महिन्यांपासून मानधनाविना

मंगरुळपीर तालुक्यातील संगणक परिचालक ११ महिन्यांपासून मानधनाविना

Next
ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यात ७६ ग्रामपंचायती असून, यातील ५५ ग्रामपंचायतींमध्ये संगणक परिचालक नियुक्त करण्यात आले आहेत.एप्रिल २०१६ पासून या संगणक परिचालकांना मानधनच मिळालेले नाही. मंगरुळपीर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे धनादेश जिल्हा परिषदेकडे जमा झालेले नाहीत. 

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या  संगणक परिचालकांना गेल्या ११ महिन्यांपासून हक्काचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे दिवसरात्र राबून ग्रामस्थांना आॅनलाइन सेवा पुरविणाºया या संगणक परिचालकांवर उपासमारीची पाळी आली आहे. 

मंगरुळपीर तालुक्यात ७६ ग्रामपंचायती असून, यातील ५५ ग्रामपंचायतींमध्ये संगणक परिचालक नियुक्त करण्यात आले आहेत. या संगणक परिचालकांना करारानुसार ५ हजार रुपये महिना मानधन देण्यात येते; परंतु एप्रिल २०१६ पासून या संगणक परिचालकांना मानधनच मिळालेले नाही. त्यामुळे या संगणक परिचालकांवर उपासमारीची पाळी आली आहे. यातील काही संगणक परिचालकांना ४०० ते ५०० रुपये प्रमाणे तुटपुंजाी रक्कम देण्यात आली; परंतु पूर्ण मानधन अद्यापही मिळालेले नाही.  महाराष्ट्र शासनाच्या विविध आॅनलाईन सेवांसाठी दिवसरात्र राबणाºया या संगणक परिचालकांना आधीच तुटपुंजे मानधन असताना तेसुद्धा अनेक महिने मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत संगणक परिचालकांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात संगणक परिचालकांनी वेळोवेळी गटविकास अधिकाºयांसह संबंधितांकडे निवेदन सादर करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यातच तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांच्या मानधनाचे मागील ३ महिन्यांचे धनादेश पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे जमाच करण्यात आले नाही. वाशिम जिल्हापरिषदेंतर्गत वाशिम रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा या पाच पंचायत समित्यांच्यावतीने संगणक परिचालकांच्या मानधनाचे धनादेश नियमित जमा झाले आहेत. केवळ मंगरुळपीर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे धनादेश जिल्हा परिषदेकडे जमा झालेले नाहीत. 

कामबंद आंदोलनाचा पावित्रा

मंगरुळपीर तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांचे एप्रिल २०१७ पासूनचे मानधन अद्यापही मिळाले नाही. याबाबत गटविकास अधिकारी आणि इतर संबंधितांकडे वारंवार मागणी करून आणि निवेदन सादर करूनही काहीच फायदा न झाल्याने अखेर १६ फेबु्रवारीपासून या संगणक परिचालकांनी  कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मुखमाले यांच्या नेतृत्वात मंगरुळपीरच्या तहसीलदारांना निवेदनही सादर करण्यात आले आहे. येत्या २२ फेब्रुवारीपर्यंत याची दखल न घेतल्यास संगणक परिचालक पंचायत समितीसमोर कुटुंबासह  बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. 

Web Title: Computer operators in Mangrolpir taluka not get sallary from 11 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.