4128 candidates in Washim district will get pre-examination of state service! | वाशिम जिल्ह्यातील ४१२८ उमेदवार देणार राज्य सेवा पूर्व परीक्षा!
वाशिम जिल्ह्यातील ४१२८ उमेदवार देणार राज्य सेवा पूर्व परीक्षा!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा येत्या रविवार, १७ फेब्रुवारी रोजी वाशिममधील १२ परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४१२८ उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.
परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र परीक्षार्थींनी स्वत: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून ‘डाऊनलोड’ करून घ्यावे. परीक्षेस येताना प्रवेशपत्रासोबतच स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना (फक्त स्मार्टकार्ड प्रकारचा) यापैकी कोणतेही दोन मूळ ओळखपत्र व त्याची एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी व ती स्वत:च्या स्वाक्षरीसह (सेल्फ अटेस्टेड) समवेक्षकाकडे जमा करणे अनिवार्य आहे.
परीक्षेत कॉपी, गैरप्रकार करताना आढळल्यास संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची  पोलिस कर्मचाºयांकडून तपासणी (फ्रीस्किंग) करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 
जिल्हाधिकारी स्वत: ठेवणार लक्ष
परीक्षार्थींनी परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन, पेजर, इतर दूरसंचार साधने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अथवा दूरसंचारासाठी वापरण्यात येणारी कोणतीही संपर्क साधने, पुस्तके, पेपर्स, अथवा परिगणक आदी प्रकारचे अनधिकृत साहित्य जवळ बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षेकरिता नियुक्त केलेल्या समवेक्षकांना सुध्दा परीक्षेच्या दालनात मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेवर जिल्हाधिकारी स्वत: लक्ष ठेवणार आहेत.


Web Title: 4128 candidates in Washim district will get pre-examination of state service!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.