टोयोटो कारमधून ३६ लाखांची रोकड जप्त; निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई

By सुनील काकडे | Published: March 30, 2024 07:24 PM2024-03-30T19:24:34+5:302024-03-30T19:24:55+5:30

त्यातील १६ लाखांच्या रकमेचा परवाना आहे; तर २० लाखांची रक्कम संशयास्पद असल्याचे चाैकशीदरम्यान निष्पन्न झाले.

36 lakh cash seized from Toyota car; Actions of Election Static Survey Team | टोयोटो कारमधून ३६ लाखांची रोकड जप्त; निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई

टोयोटो कारमधून ३६ लाखांची रोकड जप्त; निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई

सुनील काकडे
वाशिम : कारंजा ते अमरावती रस्त्यावरील धनज बु. येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने अमरावतीकडून येणाऱ्या एका कारमधून ३६ लाख १३ हजारांची रोकड जप्त केली. ही कारवाई ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली. त्यातील १६ लाखांच्या रकमेचा परवाना आहे; तर २० लाखांची रक्कम संशयास्पद असल्याचे चाैकशीदरम्यान निष्पन्न झाले.

प्राप्त माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर ठिकठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहेत. धनज बु. येथील पथकामध्ये समाविष्ट पुरूषोत्तम ठाकरे, ब्रह्मानंद राऊत, गजेंद्र पाखरे, अजय ढोके, सुनील मेहरे यांच्याकडून ३० मार्च रोजी ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू होती. यादरम्यान अमरावतीवरून येणाऱ्या एम.एच. २७ बी.एक्स. १०५६ क्रमांकाच्या टोयोटा कारची तपासणी केली असता, पवन डोंगरे व मंगेश भागवतकर यांच्याकडे ३६ लाख १३ हजार रुपयांची रक्कम असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

चालक नरेंद्र ढोले याच्यासह अन्य दोघांकडे विचारणा केली असता, एटीएम व बँकेत भरणा करण्याकामी रक्कम घेऊन जात असल्याचे आणि निवडणूक आयोगाची परवानगी, क्यू-आर कोड असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, क्यू-आर कोडला स्कॅन केले असता १६ लाख रुपये वाहतूक करण्याची परवानगी असल्याचे आढळून आले. उर्वरित २० लाख रुपये वाहतूक करण्याची परवानगी नसल्याने ही रक्कम संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले.
स्थिर सर्वेक्षण पथकाने घटनेची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे व सहायक खर्च निरीक्षक युसूफ शेख यांना फोनद्वारे कळविली. संबंधितांनी संपूर्ण रक्कम जप्त करण्याचे फर्मान सोडले.

आयकर विभागाकडे प्रकरण सुपूर्द

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक आचार संहिता कालावधीत १० लाखांपेक्षा अधिक रक्कम अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे आढळल्यास त्याचा तपास आयकर विभागाला करावा लागतो. त्याअनुषंगाने पुढील तपासकामी हे प्रकरण आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले, अशी माहिती सहायक निवडणूक
निर्णय अधिकारी कैलास देवरे यांनी दिली.

Web Title: 36 lakh cash seized from Toyota car; Actions of Election Static Survey Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.