वाडा : तालुक्यातील खेरा-कोंढला रस्त्याचे काम पंतप्रधान सडक योजना विभागाकडून करण्यात येत असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याची तक्रार शिवसेना कुडूस विभागप्रमुख जनार्दन भेरे पंतप्रधान ग्रामसडक विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनाद्वारे केली.
पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागाने सुमारे ३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून या रस्त्याच्या कामाला मंजूरी दिली होती. हे काम गजानन कन्स्ट्रक्शनला देण्यात आले असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. मुरम टाकणे बंधनकारक असतांना लाल माती टाकली आहे. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे पडून पूर्ण रस्ता खराब होईल. रोलींग करून मुरमाचा भराव न घालता एकदाच माती टाकली जात असून त्यावर पाणी देखील मारले जात नाही. या परीसरात लॅब नसल्याने मातीची टेस्ट झालेली नाही. शाखा अभियंता विनोद घोलप हे येथे येतच नसल्याने काम नियमाप्रमाणे चालू आहे ती नाही हे समजत नाही. ठेकेदाराच्या संगनमताने हे काम होते आहे, असे ग्रामस्थ सांगतात. काम अपूर्ण असतांनाही बिले दिली गेलीत, अशी चर्चा आहे.
या रस्त्याच्या कामाचा दर्जा न राखल्याने या रस्त्यावर टाकलेली लाल माती संपूर्ण काढून तेथे टेस्ट झालेला मुरूमाचा भराव करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात या रस्त्यावर देखरेख ठेवणारे शाखा अभियंता विनोद घोलप यांच्याशी संपर्क साधला असता या रस्त्यावरील माती टेस्ट करण्यासाठी लॅब नसल्याने ती दुसरीकडून टेस्ट करून आणावी लागत असून देखरेख ठेवण्याचे काम माझे नाही. कारण मी खाजगी दोन माणसे नियुक्त केली असून गरज भासेल, तेव्हाच मी येथे येत असल्याची माहिती त्यांनी दिली. या रस्त्याचे काम करणारे ठेकेदार संदीप गणोरे यांच्याशी संपर्क साधला असता काम नियमाप्रमाणे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)