मीरा रोड : प्रसुतीगृहावरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 06:08 PM2019-01-20T18:08:41+5:302019-01-20T18:11:54+5:30

पालिका आरक्षणातील ७११ रुग्णालयात असलेल्या पालिकेच्या जागेत दवाखाना सुरू केल्याचा भाजपाकडून महासभेत विरोध करण्यात आला. तर आधीच या प्रकरणात टीकेची झोड उठत असल्याने अडचणीत आलेल्या भाजपाने काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्याशी संबंधित संस्थेच्या रुग्णालयाकडे बोट दाखवत तेथे करारानुसार सवलत मिळत नसल्याचा मुद्दा मांडला.

Mira Road : dispute between BJP and Congress over Maternity home | मीरा रोड : प्रसुतीगृहावरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी 

मीरा रोड : प्रसुतीगृहावरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी 

Next

मीरा रोड - पालिका आरक्षणातील ७११ रुग्णालयात असलेल्या पालिकेच्या जागेत दवाखाना सुरू केल्याचा भाजपाकडून महासभेत विरोध करण्यात आला. तर आधीच या प्रकरणात टीकेची झोड उठत असल्याने अडचणीत आलेल्या भाजपानेकाँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्याशी संबंधित संस्थेच्या रुग्णालयाकडे बोट दाखवत तेथे करारानुसार सवलत मिळत नसल्याचा मुद्दा मांडला. काँग्रेसने देखील शिवसेनेच्या साथीने त्यास प्रत्युत्तर दिल्याने राजकीय खडाजंगी चांगलीच रंगली.

पालिका आरक्षणात स्वत:चे ७११ रुग्णालय सुरू करणाऱ्या भाजपा आमदार नरेंद्र मेहता व संबंधितांच्या कंपनीने गेली ६ वर्ष पालिकेला मात्र दवाखाना व प्रसुतीगृहसाठी बांधकाम दिले नसल्या वरुन सामाजिक संस्थांनी चालवलेल्या आंदोलनामुळे मेहता आणि भाजपा चांगलेच अडचणीत आले आहेत. टीकेची झोड आणि रुग्णालय चोर असे आरोप होत असल्याने भाजपा नेतृत्वाने देखील विरोधाची धार कमी करण्यासाठी हुसैन यांच्या संस्थेच्या रुग्णालयाकडे मोर्चा वळवला.

त्या अनुषंगानेच महासभेत शहरातील नागरिकांना शासनाच्या धोरणानुसार मोफत औषधोपचार देणे असा विषय महापौर डिंपल मेहता यांनी आणला होता. त्याला प्रशासनाचा गोषवाराच नसल्याने केवळ चर्चा झडली. पण चर्चेत भाजपाचे स्थायी समिती सभापती रवी व्यास, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, डॉ. राजेंद्र जैन, डॉ. सुशील अग्रवाल, सुरेश खंडेलवाल, वंदना मंगेश पाटील आदींनी हुसेन यांच्या उमराव संस्थेच्या रुग्णालयात शासकिय कर्मचारी, दुर्बल घटकांसाठी मोफत उपचार मिळत नसल्याचे तसेच भरमसाठ पैसे घेतले जात असल्याचा मुद्दा मांडला.
त्यावर काँग्रेसचे अनिल सावंत यांनी पालिकेकडे मोफत उपचार केलेल्यांची यादी व आकडेवारी नियमित दिली जात असल्याचे सांगत ७११ कंपनीनेच उलट ६ वर्ष पालिकेला जागा न दिल्याने नागरिकांना वैद्यकिय सुविधेपासून वंचित ठेवल्याचे प्रत्युत्तर दिले.
उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मात्र मुझफ्फर हुसेन हे दानशुर असून त्यांच्याशी सवलती बाबत चर्चा करावी, असे सांगत भाजपा नगरसेवकांच्या आरोपांची हवाच काढून टाकली. रुग्णालयाबाहेर सवलती बद्दलचा फलक लावावा, असे निर्देश महापौरांनी दिले.
पालिकेचा दवाखाना सुरू केल्याचा भाजपाकडून विरोध
७११ रुग्णालयात पालिकेने शनिवारी सकाळी दवाखाना सुरु केला म्हणून भाजपा नगरसेवकांनी त्याचा जोरदार विरोध केला. ध्रुवकिशोर पाटील यांनी तर, तिकडे आधी दवाखाना का सुरू केला असे प्रशासनाला खडसावले. तिकडे श्रीमंत लोकं राहतात असे ते म्हणाले. त्यावर पालिकेची जागा मिळवण्यासाठी आणि दवाखाना सुरू करण्यासाठी आंदोलन करावे लागते हे लाजिरवाणे असल्याचा टोला काँग्रेस - सेना नगरसेवकांनी लावला.
 

Web Title: Mira Road : dispute between BJP and Congress over Maternity home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.