पालघरला शार्कच्या हल्ल्यात मच्छीमाराने गमावला पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 10:23 AM2024-02-16T10:23:54+5:302024-02-16T10:24:46+5:30

वैतरणा खाडीतील घटना : गरोदर मादी शार्कचा पिल्लांसह मृत्यू

A fisherman lost his leg in a shark attack in Palghar | पालघरला शार्कच्या हल्ल्यात मच्छीमाराने गमावला पाय

पालघरला शार्कच्या हल्ल्यात मच्छीमाराने गमावला पाय

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/मनोर : भक्ष्याच्या शोधात थेट खाडीत शिरलेल्या शार्क माशाने केलेल्या हल्ल्यात एका मच्छीमार युवकाला पाय गमवावा लागला आहे. मनोर येथील वैतरणा खाडीत ही दुर्घटना घडली. दरम्यान, हल्ला करणारा शार्क मादी जातीचा असून तो मृत झाला आहे. मादी शार्कच्या पोटातून १५ पिल्ले निघाली. मृत शार्कला पाहण्यासाठी स्थानिकांनी खाडीकिनारी गर्दी केली होती. 

मनोर डोंगरी येथील विकी गोवारी (३४) याने मासे पकडण्यासाठी खाडीत जाळे लावले होते. जाळ्यात किती मासे लागले हे पाहण्यासाठी तो मंगळवारी रात्री खाडीत उतरला असता त्याच्यावर सात फूट लांब आणि ५०० किलो वजनाच्या मादी शार्कने हल्ला चढवला. या हल्ल्यात विकी जबर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला सिल्व्हासा येथील विनोबा भावे रुग्णालयात दाखल केले. शार्कचा चावा एवढा जबर होता की विकी याच्या पायाचा गुडघ्यापासूनचा भाग डॉक्टरांना कापून टाकावा लागला. 

विकीवरील हल्ल्यानंतर स्थानिकांनी शार्कला पकडले होते. त्यानंतर खाडीकिनारी मादी शार्क मृतावस्थेत आढळला. मादी शार्कच्या पोटातून १५ पिल्ले काढण्यात आली. मादी शार्क आणि पिल्लांवर डहाणू येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पालघर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल संखे यांनी ‘लोकमत’ला दिली. 

स्थानिकांनी शार्कला पकडले
मादी शार्क प्रसूतीसाठी खाडीत शिरली असावी. त्यातच कमी खोलीच्या पाण्यात आल्याने अडकली असावी आणि त्यामुळे चिडलेल्या मादी शार्कने विकीवर हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी शवविच्छेदन अहवालात मादी शार्कच्या डोक्यावर मोठा प्रहार झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

शार्कमुळे सागरी पर्यावरणाचा समतोल
सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वोच्च भक्षक म्हणून शार्क माशाची ओळख आहे. सुमारे ५०० हून अधिक शार्क माशांच्या प्रजाती जगातील महासागरात अस्तित्वात असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या माशांची मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाऊ लागल्याने या प्रजातीचे अस्तित्व अवघे १० टक्क्यांवर आले आहे. शार्कचा दरवर्षी वाढत जाणारा मृत्युदर हा जन्मदराशी सुसंगत राहिलेला दिसून येत नसल्याचे सीएमएफआरआयच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 
शार्क माशांचा गर्भधारणेचा कालावधी हा दीर्घकालीन असून तो जवळपास एक वर्ष किंवा त्याहून अधिक असतो. एकाच वेळी पिलांना जन्म देण्याची क्षमताही फार कमी असल्याने ती २ ते १५ पिल्ले एवढीच मर्यादित असते. शार्क माशाच्या जवळपास ९७ टक्के प्रजाती या मानवास हानीकारक नाहीत. त्यामुळे मानवजातीनेसुद्धा त्यांना हानी न पोहोचवता त्यांचे सुरक्षितपणे जगण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read in English

Web Title: A fisherman lost his leg in a shark attack in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.