चार गावे पाणीदार होण्याच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:03 PM2018-05-21T22:03:21+5:302018-05-21T22:03:49+5:30

सध्या वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून देवळी तालुक्यातील चार गावशिवारात जलसंवर्धनाची मोठ्या प्रमाणात कामे श्रमदानाच्या माध्यमातून केली जात आहेत.

On the way to the four villages being drenched | चार गावे पाणीदार होण्याच्या वाटेवर

चार गावे पाणीदार होण्याच्या वाटेवर

Next
ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : श्रमदानातून ५०० टॅँकर पाण्याची साठवण होईल इतके काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून देवळी तालुक्यातील चार गावशिवारात जलसंवर्धनाची मोठ्या प्रमाणात कामे श्रमदानाच्या माध्यमातून केली जात आहेत. पावसाचे पाणी गाव शिवारातच साठवून भूगर्भातील जल पातळीत वाढ व्हावी या हेतूने पिपरी (भा.), कविटगाव, काजळसरा व सोनेगाव (बा.) या गावांत आतापर्यंत एकूण १ हजार ४८२ घ.मी. सी.सी.टी.चे काम करण्यात आले आहे. दगडी बांध व माती बांधाचे एकूण ५३६ मीटर काम झाले आहे. सदर कामांमुळे या गाव शिवारात सुमारे ५०० टँकर पाण्याची साठवणूक होईल, असे सांगण्यात आले.
पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेत देवळी तालुक्यातील पिपरी (भा.), कविटगाव, काजळसरा व सोनेगाव (बा.) या गावांनी सहभाग घेतला आहे. या पाचही गावांतील नागरिक आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी पहाटेच हातात टिकास, कुदळ, फावडे व टोपले घेऊन श्रमदानासाठी निघतात. इतकेच नव्हे तर या श्रमदात्यांचा उत्साह वाढविण्यासाठी काही सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि चक्क काही लोकप्रतिनिधीही सदर गाव गाठून प्रत्यक्ष श्रमदानात सहभागी होत आहेत. देवळी तालुक्यातील पिपरी (भा.) या भागात ९७ मीटरचा दगडी बांध, ४३९ मीटरचा मातीचा बांध व ४७ घनमिटर सीसीटीची कामे झाली आहेत. कविटगाव येथे ५०० घ.मी., काजळसरा येथे ३५ घ.मी. व सोनेगाव (बा.) येथे ९०० घ.मी. सीसीटीचे काम आतापर्यंत श्रमदानाच्या माध्यमातून झाल्याचे सांगण्यात आले आहे. या कामांची पाहणी नुकतीच वन विभागाच्या अधिकाºयांनी केली असून त्याबाबतचा अहवाल त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सादर केलेला आहे.

दुष्काळमुक्तीच्या चळवळीला वेग
दुष्काळातून गावे मुक्त करण्यासाठी वॉटर कपच्या निमित्ताने ग्रामस्थ सरसावले आहेत. त्यांना लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, प्रशासन यांचे मिळणारे पाठबळ प्रेरणादायी ठरत आहे. यामुळेच देवळी तालुक्यातील चारही गावांनी कामांत सरशी घेतल्याचे दिसते.

देवळी तालुक्यातील चार गावांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे सदर गाव शिवारात पावसाळ्याच्या दिवसांत सुमारे ५०० टँकर पावसाच्या पाण्याची साठवणूक होणार आहे.
- सागर बन्सोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, वर्धा.

दादाराव केचे यांचे टेंभरी (प.) येथे श्रमदान
आर्वी - तालुक्यातील परसोडी गट ग्रामपंचायत मध्ये असलेल्या टेंभरी येथे माजी आमदार दादाराव केचे यांनी श्रमदान करून ग्रामस्थांसोबत दुष्काळाशी दोन हात केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘दुष्काळ मुक्त महाराष्ट्र’ करण्यासाठी जनतेच्या सहभागातून झालेल्या कामांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून साकारलेल्या वॉटर कप या स्पर्धेसाठी आर्वी तालुक्यातील हे दुसरे वर्ष आहे. तालुक्यात या स्पर्धेसाठी कमालीची उत्सुकता आहे. मागील सत्रापेक्षा यावर्षी अधिक प्रमाणात जन तथा स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग उत्स्फूर्तपणे मिळत असल्याने मागील वर्षीचे महाराष्ट्रातून मिळालेले प्रथम क्रमांकाचे बक्षिस अबाधित राहण्याची शक्यता अधिक आहे. टेंभरी या गावात सातत्याने श्रमदान करून जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. या गावात बालकांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्व दररोज तळपत्या उन्हाला न जुमानता पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत अथक परिश्रम करीत आहे. श्रमदानाच्या माध्यमातून दुष्काळमुक्त टेंभरी करण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू आहे. जेवण, नाश्ता यासाठी घरी न जाता टेंभरी वासियांनी क्रमाक्रमाने प्रत्येकाला दिवस वाटून दिले आहे. तो व्यक्ती अल्पोपहारापासून जेवणापर्यंत दिलेली जबाबदारी स्वीकारुन पार पाडत आहे. श्रमदानाच्या ठिकाणी सामूहिक भोजन हा नित्यक्रम झाला आहे. यामुळे वेळेची बचत होत असून या गावातील एकीचे बळ लक्षात येत आहे. टेंभरी गावात सद्यस्थितीत पाणी फाऊंडेशनशिवाय दुसरा विषयही चर्चिला जात नाही. या बाबत माजी आमदार दादाराव केचे यांनी स्तुती करीत टेंभरी गाव दुष्काळ मुक्त तर नक्कीच होईल, सोबतच एकीच्या बळावर गावाचा विकास साध्य करता येईल, सांगितले. ४४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात उभे राहणेही कठीण असताना श्रमदानातून होणारी कामे वाखाणण्याजोगी आहे. टेंभरीप्रमाणे इतर गावांनी श्रमदानातून जिद्दीने दुष्काळ मुक्तीसाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहे. यामुळे सहभागी गावे आजच बक्षिसपात्र असून दुष्काळमुक्त गाव झाल्यास भावी पिढीला दुष्काळाची झळ पोहोचणार नाही, हेच मोठे बक्षिस ठरेल, असे केचे यांनी सांगितले. श्रमदानात अशोक निकम, राजू मानकर, दिलीप श्रीरामे, सुभाष राठोड, विजय जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जनहित मंचाचे खडका गावात श्रमदान
रसुलाबाद- वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या खडका गावातही श्रमदानाचे तुफानच आले आहे. जनहित मंच वर्धा या संस्थेनेही श्रमदान करीत ग्रामस्थांचा उत्साह वाढविला.
रविवारी खडका या गावात जाऊन जनहित मंचच्या सदस्यांनी महाश्रमदानात आपला खारीचा वाटा उचलला. शहरातील नागरिक खेड्यात जाऊन पाणी समस्या दूर करण्यासाठी श्रमदान करीत असल्याचे ग्रामस्थांना अप्रूप वाटत असून आनंदही झाला आहे. या श्रमदानामुळे ग्रामस्थांचाही उत्साह वाढत आहे. या महाश्रमदानात सचिव डॉ. राजेश आसमवार, उपाध्यक्ष सुभाष पाटणकर, डॉ. जयंत मकरंदे, दिनेश रूद्रकार, अरुण गालकर, विजय बोभाटे, अनिल जंगितवार, मनोज पारखी, डॉ. मनोज बडगईय्या, पराग चावरे, प्रमोद चौधरी यांच्यासह जनहित मंचच्या इतर सदस्यांनीही सहभाग नोंदविला.

Web Title: On the way to the four villages being drenched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.