पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या दोघांना ५० फूट नेले फरपटत; दोघांच्याही मृतदेहाच्या चिंधड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 01:08 PM2023-06-29T13:08:01+5:302023-06-29T13:08:39+5:30

हिंगणघाटनजीक मध्यरात्री अपघात

Two puncture repair man were carried 50 feet away by speeding truck, both died | पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या दोघांना ५० फूट नेले फरपटत; दोघांच्याही मृतदेहाच्या चिंधड्या 

पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या दोघांना ५० फूट नेले फरपटत; दोघांच्याही मृतदेहाच्या चिंधड्या 

googlenewsNext

वर्धा : मालवाहू वाहनाच्या पंक्चर टायरची दुरुस्ती करणाऱ्या दोघांना मागाहून भरधाव आलेल्या ट्रकने जवळपास ५० फूट अंतरापर्यंत फरपटत नेले. हा अपघात २७ रोजी मध्यरात्री २:३० वाजताच्या सुमारास हिंगणघाट जवळून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही मृतदेहांच्या चिंधड्या झाल्या. याप्रकरणी ट्रकचालकास हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे.

सुरेश विठ्ठलराव कळंबे आणि ज्ञानेश्वर अण्णाजी महाजन दोन्ही रा. हिंगणघाट अशी मृतांची नावे आहे. तर पोलिसांनी ट्रकचालक आमीन सब बुरान सब रा. ताराटी कर्नाटक याला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुरेश कळंबे आणि ज्ञानेश्वर महाजन हे दोघे एम.एच. ३२ ए.जे. ३६९२ क्रमांकाच्या मालवाहूने हिंगणघाटकडे जात असताना अचानक मालवाहूचा टायर पंक्चर झाला. त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेट्राेलपंपासमोरील रस्त्याकडेला मालवाहू थांबवून पंक्चर झालेला टायर बदली करीत होते. दरम्यान मागाहून भरधाव आलेल्या केए. ३४ सी. ७११६ क्रमांकाच्या ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या दोघांनाही मागील चाकात घेत जवळपास ५० फूट अंतरावर फरपटत नेले. दोघांचाही जागीच मृत्यू झाला असून मृतदेहांच्या चिंधड्या उडाल्या होत्या.

या दुर्दैवी घटनेने हिंगणघाट शहरात शोककळा पसरली आहे. हिंगणघाट पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. ट्रकचालकास अटक करून ट्रक पोलिस ठाण्यात लावल्याची माहिती दिली.

Web Title: Two puncture repair man were carried 50 feet away by speeding truck, both died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.