निधीअभावी रखडले पं.स. इमारतीचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:08 PM2017-11-28T22:08:20+5:302017-11-28T22:08:38+5:30

गावपातळीवरच्या कामांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य पंचायत समित्या करतात.

Pulsed for lack of funds Construction of the building | निधीअभावी रखडले पं.स. इमारतीचे बांधकाम

निधीअभावी रखडले पं.स. इमारतीचे बांधकाम

Next
ठळक मुद्दे७५ टक्के काम पूर्ण : २५ टक्क्यांसाठी वाढल्या अडचणी

आॅनलाईन लोकमत
आष्टी (शहीद) : गावपातळीवरच्या कामांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य पंचायत समित्या करतात. बरीच वर्षे भाडेतत्वावरील इमारतीत काढल्यानंतर राज्य शासनाने स्वतंत्र इमारत बांधकामास निधी उपलब्ध करून दिला; पण वेळेवर येणारा निधी अवेळी येत असल्याने बांधकामात अडथळे निर्माण होतो. याचाच प्रत्यय येथील पं.स. इमारत बांधकामात येत आहे. ७५ टकके काम पूर्ण झालेल्या या इमारतीला २५ टक्के एवढाच निधी कमी पडला. मंत्रालयातून यासाठी निधी न आल्याने जि.प. बांधकाम विभागाने हात वर केलेत. संबंधित एजेंसी बिलासाठी प्रतीक्षा करीत आहे.
दोन वर्षांपूर्वी येथील पंचायत समिती इमारत बांधकामासाठी माजी आमदार दादाराव केचे यांनी निधी मंजूर करून आणला. इमारत बांधकामाला सुरुवात झाली. मूळ स्ट्रक्चरचे बांधकाम पूर्ण झाले. आता संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, विजेची जोडणी, टाईल्स, रंगरंगोटी, पाण्याची पाईपलाईन जोडणी, नाली व गटार यासह अन्य किरकोळ कामांसाठी निधी शिल्लक नाही. सध्या या इमारतीवर एकूण पावने दोन कोटी निधीपैकी १ कोटी ५ लाख रुपये खर्च झाला आहे. उर्वरित कामासाठी ७० लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी कधी येणार व कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मागील देयक देण्यासाठी निधी आला होता. तो निधी संबंधित एजेंसीला वितरित करण्यात आला असून बांधकाम करण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले. दोन वर्षांत झपाट्याने बांधकाम झाले आहे; पण निधीच नसेल तर यंत्रणा काय करणार, असा प्रश्न उपस्थित आहे. सध्याचे बांधकाम वगळता इतर सर्व कामांसाठी किमान ६ महिने वेळ लागू शकतो; पण निधी न आल्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्याच्या निर्मितीपासून पंचायत समिती इमारत बांधकामाची मागणी होती. यासाठी माजी आमदार दादाराव केचे यांनी अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर पंचायत समिती इमारत मंजूर करण्यात आली. यासाठी लोकमान्य विद्यालयाजवळ प्रशस्त जागाही मिळाली आहे. ७५ टक्के काम पूर्ण झाले असताना केवळ २५ टक्के काम निधीअभावी रखडले आहे. आता ते काम पूर्ण होण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. तालुक्यातील नागरिकांच्या सेवेत ही इमारत कधी येणार, हे येणारा निधीच ठरवू शकणार आहे.

Web Title: Pulsed for lack of funds Construction of the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.