आता नियोजन खरिपाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:16 PM2019-04-28T23:16:47+5:302019-04-28T23:18:11+5:30

बांधावरच सूर्योदय अन् सूर्यास्त पाहणाऱ्या शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या असल्याने येणाऱ्या खरीप हंगामात कोणते पीक घेतल्याने आर्थिक सुबत्ता येईल, याकडे लक्ष देऊनच खरिपाचे नियोजन करताना शेतकरी दिसत आहे.

Plans for planning now! | आता नियोजन खरिपाचे!

आता नियोजन खरिपाचे!

Next
ठळक मुद्देया हंगामात तरी सुबत्तेची शेतकऱ्याला आशा : आर्थिक जुळवाजुळव सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : बांधावरच सूर्योदय अन् सूर्यास्त पाहणाऱ्या शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या असल्याने येणाऱ्या खरीप हंगामात कोणते पीक घेतल्याने आर्थिक सुबत्ता येईल, याकडे लक्ष देऊनच खरिपाचे नियोजन करताना शेतकरी दिसत आहे.
पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्याला चांगले दिवस येईल, ही आशा फोल ठरल्याने नशिबाला दोष देऊन आपली शेती करून आपले जीवन जगावे, अशी भावना आहे. अवघ्या एक महिन्यावर असलेल्या मृग नक्षत्राकडे लक्ष लागले असल्याने बियाण्यांची निवड, मिळणारे भाव, याचा अंदाज लावला जात आहे कपाशी, सोयाबीन हीे दोन मुख्य पिके खरीप हंगामात घेतली जातात. मागील हंगामाचा विचार पूर्वपेरणी अगोदर केला जात आहे. या हंगामात दोन्ही पिके समसमान राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापसाला उलंगवाडीनंतर मिळालेला सहा हजारांहून अधिक भाव पुढीलवर्षी असाच राहील का, याचे अनुमान काढून भावाची आशा पाहता कपाशीचा पेरा अधिक होण्याची शक्यता आहे. खरीप अवघ्या एक महिन्यावर असताना जाणवत असलेली भीषण पाणीटंचाई व वेळेवर पाऊस आला नाही तर नियोजन बिघडेल का, अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहे. बियाणे रासायनिक खते, याची जुळवाजुळव करण्यासाठी आर्थिक तरतूद केली जात असल्याचे दिसून येत आहे. शेताची उन्हाळवाही झाल्याचे चित्र असून वाढत्या तापमानामुळे शेतीचे कामे थांबले आहे. जनावरांचा पाणी, वैरणाचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. कपाशीचा बियाणे, खत, फवारणी व वेचणी हा खर्च पाहता पीक सद्यस्थितीत परवडणारे नसल्याचे शेतकरी सांगतात. सोयाबीनचे अलीकडे घटत असलेले उत्पादन चिंतेचा विषय आहे . वाढत्या खर्चात विजेचे बिल, घरखर्च, मुलांचे शिक्षण व इतर खर्च शेतीतील उत्पन्नातून करावा लागतो. यामुळे शेतकरी सातत्याने कर्जात राहत असल्याची वास्तविकता आहे. या कर्जाच्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी शेतकरी विविध प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना संकटाचा सामना करीत हातात आलेले उत्पन्न हेच वर्षभराची जीवन जगण्याची पुंजी असते. रब्बी हंगामावर अवलंबून राहणे आता कठीण झाले आहे. खरिपाचे नियोजन हे पक्के असण्यासाठी शेतकरी आता कामाला लागले असले तरी पेरा कोणत्या पिकाचा जास्त असेल, हे पावसावर अवलंबून राहणार आहे.
खरिपावर वर्षभराचा डोलारा
सेलू तालुक्यात केळी पिकाकडे पाठ फिरविल्यानंतर शेतकऱ्यांचा कापूस पीक घेण्याकडे कल आहे. चांगले उत्पादन घेण्यासाठी महागडा खर्च केला जातो; पण वर्षभराचा खर्च खरिपाच्या पिकावर चालावा, ही अपेक्षा असते.
अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढलेले बी-बियाण्यांचे भाव, रासायनिक खतांचा भाव पाहता कपाशी व सोयाबीन मालाचे भाव पेरणीपूर्व जाहीर झाल्यास नियोजन करणे सोपे जाईल, असे शेतकरी बोलत आहेत.

Web Title: Plans for planning now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.