कांबळे गटाला बाप्पा पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:32 PM2018-09-13T23:32:33+5:302018-09-13T23:33:39+5:30

युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा निकाल आज गणेशोत्सवाच्या दिवशी जाहीर झाला. यात आमदार रणजित कांबळे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवत दणदणीत विजय मिळवून जिल्हाध्यक्षपदासह दोन विधानसभा अध्यक्षही निवडून आणले. त्यामुळे आज कांबळे गटाला बाप्पा पावले, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

The Kamble Group has grown up | कांबळे गटाला बाप्पा पावले

कांबळे गटाला बाप्पा पावले

Next
ठळक मुद्देयुकाँ निवडणूक : जिल्हाध्यक्षपदी विपीन राऊत तर उपाध्यक्ष गौरव देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा निकाल आज गणेशोत्सवाच्या दिवशी जाहीर झाला. यात आमदार रणजित कांबळे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवत दणदणीत विजय मिळवून जिल्हाध्यक्षपदासह दोन विधानसभा अध्यक्षही निवडून आणले. त्यामुळे आज कांबळे गटाला बाप्पा पावले, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे वर्धा विधानसभा अध्यक्षपद शेंडे गटाने बहूमताने हिसकाऊन वर्चस्व दाखवून दिले.
युवक काँग्रेसच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात आमदार रणजित कांबळे गट आणि काँग्रेसचे प्रदेश महासचिव शेखर शेंडे गटामध्ये चांगलीच ओढाताण निर्माण झाली होती. तीन दिवस चाललेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर आज नागपुरात मतमोजणी घेण्यात आली. यावेळी कांबळे गटाचे विपीन राऊत यांनी शेंडे गटाचे गौरव देशमुख यांचा पराभव करीत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद बळकावले. त्यामुळे नियमानुसार गौरव देशमुख यांच्या वाट्याला जिल्हा उपाध्यक्षपद आले आहे. आर्वी विधानसभा क्षेत्र वगळता देवळी, हिंगणघाट व वर्धा विधानसभा क्षेत्रात दोन्ही गटाकडून अध्यक्षपदाकरिता उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले होते. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी रिंगणात असलेले विपीन राऊत यांना ६६२ तर गौरव देशमुख यांना ५१२ मत मिळाली. यात विपीन राऊत यांचा विजय झाला. वर्धा विधानसभा अध्यक्षपदाकरिता कांबळे गटाचे विराज शिंदे व शेंडे गटाचे कुणाल भाकरे रिंगणात होते. यात शिंदे यांना १७२ तर भाकरे यांना ३५८ मते मिळाल्याने शेंडे गेटाने बाजी मारली. याशिवाय हिंगणघाटमध्ये कांबळे गटाचे नकूल भाईमारे यांना ८० तर शेंडे गटाचे निखिल श्रीरामे यांना ५६ मते मिळाल्याने भाईमारे विजयी झाले. तसेच देवळी विधानसभा क्षेत्रात कांबळे गटाचे निलेश ज्योत हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडणूकीत जे उमेदवार पराभूत झाले त्या सर्वांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विजयी उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला.
आर्वी विधानसभा क्षेत्र निरंक
आर्वी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार अमर काळे हे काँग्रेसचे असतानाही या मतदार संघात युवक काँग्रेसची अत्यल्प सदस्य नोंदणी करण्यात आली. त्यामुळे येथे विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार दिला नाही. येथील सदस्यांनी केवळ जिल्हाध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच मतदान केले. त्यामुळे येथील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषद गटनेत्याच्या पुत्राचा पराभव
वर्धा विधानसभा अध्यक्षपदाकरिता कांबळे गटाकडून जिल्हा परिषदचे गटनेता संजय शिंदे यांचे पुत्र विराज शिंदे रिंगणात होते. त्यांच्या विरुध्द शेंडे गटाचे कुणाल भाकरे यांनी निवडणूक लढविली. यात भाकरे यांनी ३५८ मत घेत शिंदे यांचा १८६ मतांनी पराभव केला. शिंदे यांना केवळ १७२ मतावरच समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे जि.प.गटनेत्याच्या पुत्राला इतक्या मताधिक्याने पराभव स्विकारावा लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा महासचिवांचीही झाली निवड
याच निवडणूकीदरम्यान युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिवही निवडण्यात आले. खुल्या प्रवर्गातून सचीन गुप्ता व दिपक कन्ना रिंंगणात होते. यापैकी सचीन गुप्ता यांनी १६३ मत घेऊन कन्ना यांचा ७० मतांनी पराभव केला. अनुसूचीत जाती आणि जमाती प्रवर्गातून नितीन इंगळे व विपूल ताडाम रिंगणात होते. यापैकी ताडाम यांनी ३७४ मत घेऊन इंगळे यांचा १८ मतांनी पराभव केला. इतर मागास वर्ग प्रवर्गातून राहूल सुरकार, महिला राखीव प्रवर्गातून पल्लवी खामनकर व अल्पसंख्यांक प्रवर्गातून मोहम्मद शेख हे तीन उमेदवार असल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली. यातही कांबळे गटाचेच पारडे जड राहिले आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता पक्षाची बाजू भक्कम करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.

Web Title: The Kamble Group has grown up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.