कपाशीच्या शंभर वाणांच्या तपासणीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:36 PM2018-05-25T23:36:37+5:302018-05-25T23:36:37+5:30

कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला होता. यामुळे शासनाच्यावतीने कापूस बियाण्यांच्या निम्या वाणांवर बंदी आणली. या बंदीनंतर बाजारात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांबाबत शासन चांगलेच सतर्क असल्याचे दिसत आहे.

Indicative check of one hundred varieties of cotton | कपाशीच्या शंभर वाणांच्या तपासणीचे संकेत

कपाशीच्या शंभर वाणांच्या तपासणीचे संकेत

Next
ठळक मुद्देदर्जाबाबत शासन गंभीर : नागपूरच्या प्रयोगशाळेतील अहवालावर अनेकांच्या नजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला होता. यामुळे शासनाच्यावतीने कापूस बियाण्यांच्या निम्या वाणांवर बंदी आणली. या बंदीनंतर बाजारात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांबाबत शासन चांगलेच सतर्क असल्याचे दिसत आहे. शासनाने दिलेले निर्देश या बियाणे कंपन्यांनी पाळले अथवा नाही याची दक्षता घेण्याकरिता वर्धेत कपाशीच्या शंभरावर बियाण्यांचे नमुने घेण्यात आले आहे. ते नमुने तपासणीकरिता नागपूर येथील प्रयोग शाळेत रवाना करण्यात आले आहे.
यंदाच्या खरीपात कपाशीवर बोंडअळी सारखी किड येणार नाही, याची दक्षता शासनाच्यावतीने घेण्यात येत आहे. गत वर्षी कपाशीच्या संकरीत बियाण्यांवर आलेल्या बोंड अळीमुळे बियाण्यांच्या दर्जावर प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी शासनाने कपाशीच्या बियाण्यांवरच निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. गत वर्षी बाजारात असलेल्या बियाण्यांपैकी निम्मे वाण कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यात तपासणी अंती राज्यात ४२ कंपनीच्या ३७० वाणांना परवाना देण्यात आला आहे. असा परवाना मिळालेले बियाणे जिल्ह्यात दाखल झाले आहे.
जिल्ह्यात आलेल्या बियाण्यांनी त्यांना दिलेल्या सूचना पाळल्या अथवा नाही याची तपासणी करण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने त्यांचे नमुने घेण्यात आले आहे. वर्धेत घेण्यात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. या बियाण्यांच्या तपासणीअंती यात त्रुटी आढळल्यास सदर कंननीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. बाजारात आलेल्या बियाण्यांबाबत यंदाच्या खरीपात शासन गंभीर असल्याचे दिसून आले आहे. कपाशीच्या बियाण्यांतून शेतकऱ्यांना अतिरिक्त फटका बसणार नाही यादी दक्षता कृषी विभागाच्यावतीने घेण्यात येत आहे. सोबतच बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना सतर्कता बाळगावी असे आवाहनही कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. परवाना प्राप्त कृषी केंद्रातून बियाणे घ्यावे व त्याचे पक्के देयक घेण्याचासही सल्लाही देण्यात आला आहे.
बियाणे कंपन्यांची झाडाझडती
वर्धा शहरालगत कपाशी बियाण्यांची निर्मिती करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्या गोदामाची तपासणी कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या कंपनीत असलेल्या बियाण्यांचे नमुने कृषी विभागाने घेतले आहे. तेही तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. या नमुन्यात जर शासनाच्या निकषांना बगल दिल्याचे दिसून आले तर या कंपन्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कपाशीची ३ लाख ५० हजार पाकिटे दाखल
शेतकऱ्यांकडून मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून बियाण्यांच्या वाणाची आणि त्यांच्या दराची विचारणा करण्यात येत आहे. या काळात शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेत शासनाकडून ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नव्या नियमानुसार प्रमाणित करण्यात आलेली बियाणेच खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात कपाशीच्या ३ लाख ५० हजार पाकिटे दाखल झाली आहे.
सोयाबीनच्या बियाण्यांचेही घेतले नमुने
कृषी विभागाच्यावतीने कपाशीच्याच नाही तर सोयाबीनच्या बियाण्यांचेही नमुने घेण्यात आले आहे. सोयाबीनच्या पाच वाणांचे नमुने कृषी विभागाने घेतले आहे. तेही तपासणीकरिता नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. बाजारात आतापर्यंत सोयाबीनचे १४ हजार क्विंटल बियाणे दाखल झाले आहेत.

Web Title: Indicative check of one hundred varieties of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस