भारनियमनाने पोळतोय जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:36 PM2017-10-07T23:36:23+5:302017-10-07T23:36:32+5:30

The district of Palatoya is under the control of Bharatanamman | भारनियमनाने पोळतोय जिल्हा

भारनियमनाने पोळतोय जिल्हा

Next
ठळक मुद्देशेतकरी, नागरिकांत असंतोष : उकाडा व गर्मीने सारेच बेजार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यातील विद्युत निर्मिती केंद्र कोळसा नसल्याने बंद झाल्याचे कारण देत राज्यभर भारनियमनाचा बडगा उगारण्यात आला आहे. यात महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी मात्र चढाओढच लावली आहे. जो अभियंता सर्वाधिक वीज वाचवेल, त्याला पुरस्कार, या धर्तीवरच भारनियमन लादले गेले आहे. परिणामी, नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. महावितरणने अभियंत्यांत लावलेली ही स्पर्धा बंद करून भारनियमन कमी करावे, अशी मागणी होत आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत वीज चोरी व वीज गळती अधिक असलेल्या शहर, ग्रामीण भागात भारनियमन लादले जात होते. यानंतर सिंगल फेज वीज पुरवठा पद्धत सुरू करून भारनियमन बंद करण्यात आले. आता दोन्ही पद्धती सुरू असताना अवाजवी भारनियमनाचा बडगा उगारला जात असल्याचेच पाहावयास मिळत आहे. शहरी भागात दोन ते सहा तास तर ग्रामीण भागात नऊ ते बारा तास भारनियमन केले जात आहे. परिणामी, उकाडा व गर्मीने संपूर्ण जिल्हाच पोळला जात आहे. यातही महावितरणच्या उपविभागांमध्ये स्पर्धा रंगली आहे. कोणता अभियंता अधिक वीज वाचवितो यावर शाबासकी देण्याची पद्धत रूढ केली जात आहे. यामुळे जनतेला मात्र चटके सोसावे लागताहेत. अवाढव्य बिले आकारून जनतेची लूट तर महावितरण करीत आहेच, आता भारनियमनाद्वारे नागरिकांना त्रस्त करीत आहे. या प्रकारामुळे नागरिकांतील असंतोष वाढत आहे.
जिल्ह्यातील भारनियमन त्वरित बंद करा; भीम टायगर सेनेची मागणी
जिल्हा महावितरण कंपनीद्वारे ग्रामीण भागात ८ ते ९ तास भारनियमन केले जात आहे. यात शेतकºयांना थ्री-फेज लाईन केवळ ५ ते ६ तास मिळत आहे. ही वेळ रात्री १२ ते ७ पर्यंत ठेवली आहे. शेतकरी रात्रीला कोणत्या पद्धतीने पिकांचे सिंचन करणार, हा प्रश्नच आहे. रात्री ओलित करताना शेतकºयांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांमुळेच शेतकी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. भारनियमनामुळे पाणी पुरवठाही प्रभावित होत आहे. सिंगल फेज वीज पुरवठाही उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी ग्रामस्थ त्रस्त आहेत. यामुळे भारनियमन त्वरित बंद करावे, अशी मागणी भीम टायगर सेनेने केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून विशाल रामटेके, नितीन कुंभारे, अतुल दिवे आदींनी दिला आहे.
सहा तासाच्या भारनियमनाने शेतकरी, नागरिक व रुग्ण त्रस्त
रोहणा - कोळशाच्या कमतरतेने ऊर्जा उत्पादनात घट व ऊर्जेच्या मागणीत वाढीचे कारण पूढे करून शासनने दररोज नियमित भारनियमनाच्या व्यतिरिक्त सहा तास अतिरिक्त भारनियमन सुरू करण्यात आले आहे. परिणामी, परिसरातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी व रुग्ण त्रस्त झाले आहे. हे भारनियमन त्वरित बंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अत्यल्प पावसामुळे खरीपातील कपाशी, रबीतील पिके पेरण्यासाठी जमीन तयार करताना ओलिताची गरज आहे. वातावरणातील उकाड्यामुळे घरी राहणाºया महिला, वृद्ध नागरिक व रुग्णांना पंख्याची गरज पडते. व्हायरल फीव्हरमुळे प्रत्येक घरी रुग्ण आढळतात. घरातील उकाड्यामुळे या घटकांना अस्वस्थ होत आहे. अशावेळी घराघरात विजेची गरज असताना महावितरण नियमित भारनियमनाशिवाय सोमवार, मंगळवार व बुधवारी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत तर गुरूवार, रविवार दुपारी साडेतीन ते रात्री साडेनऊपर्यंत सतत सहा तास अतिरिक्त भारनियमन करीत आहे. या भारनियमनामुळे समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. परिणामी, गावोगावी ‘हेच काय मोदींचे अच्छे दिन’, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारनियमनाने शेतातील पिकांना ओलित कसे करावे, रुग्णांवर औषधोपचार कसे करावेत, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भारनियमन त्वरित रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: The district of Palatoya is under the control of Bharatanamman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.