चिमुकल्यावर अत्याचार करणाऱ्याची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:53 PM2019-06-17T22:53:06+5:302019-06-17T22:53:19+5:30

चोरीचा आळ घेत चिमुकल्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना आर्वी येथील गुरूनानक चौकातील जोगणामाता मंदिर परिसरात घडली. या प्रकरणातील आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे हा दारूविक्रेता असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Deliver a tyrannical prisoner to a jail | चिमुकल्यावर अत्याचार करणाऱ्याची कारागृहात रवानगी

चिमुकल्यावर अत्याचार करणाऱ्याची कारागृहात रवानगी

Next
ठळक मुद्देआरोपी दारूविक्रेता; तर पीडित मुलाचे आई-वडील रोजमजूर : आरोपीला कठोर शिक्षेची सुप्रिया सुळेंची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा / आर्वी : चोरीचा आळ घेत चिमुकल्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना आर्वी येथील गुरूनानक चौकातील जोगणामाता मंदिर परिसरात घडली. या प्रकरणातील आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे हा दारूविक्रेता असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपीने चिमुकल्यावर अत्याचार करताना क्रूरतेचा कळसच गाठल्याने हा प्रकार अनेकांच्या अंगावरील शहारेच उभे करणारा ठरत आहे. विशेष म्हणजे, पीडित सात वर्षीय मुलाचे आई-वडील रोजमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतात. त्यामुळे नागरिकांकडूनही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, वर्ध्यातील या प्रकरणाची खा. सुप्रिया सुळे यांनी दखल घेत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
उमेश उर्फ अमोल ढोरे याने सात वर्षीय चिमुकल्यावर तू मंदिरात चोरी करीत आहे, असा आरोप करून त्याला नग्न करून उन्हाने तापलेल्या फरशीवर बसवले. ज्या तपलेल्या स्टाईलवर अनवारी पायाने साधे तीन सेकंद उभे राहता येत नाही, अशाच ठिकाणी आरोपीने त्या मुलाला नग्न करून बसविल्याने पीडितेच्या पार्श्वभागाला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. इतक्यावरच आरोपी थांबला नाही तर त्याने पीडित मुलाला क्रूरतेचा कळस गाठून जबरदस्तीने गरम स्टाईल्सवर दाबून धरले होते. या घटनेची तक्रार आर्वी पोलिसांत दाखल होताच पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शिवाय न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
आरोपीकडून पीडित मुलाच्या आईवर दबावतंत्राचा वापर
जखमी अवस्थेतील पीडित मुलगा रडत रडत घरी गेला. त्याने घाबरलेल्या अवस्थेत स्वतावरील अत्याचाराची माहिती त्याने आईला दिली. त्यानंतर अत्याचाराचा जाब विचारयला मुलाची आई जोगणामाता मंदिरात पोहोचली. त्यावेळी आरोपी तेथेच होता. त्याने पीडित मुलाच्या आई पुढे तुमचा मुलगा दानपेटीतून पैसे चोरी करीत होता. वास्तविक पाहता दानपेटीला त्यावेळी कुलूप होते. आरोपीने आपली चूक मान्य न करता पीडितेच्या आईलाच शिवीगाळ करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, असे म्हणणे पीडित मुलाच्या आईचे आहे.
तपास अधिकाऱ्याला फोन उचलण्याची अ‍ॅलर्जी
पंचनामा करताना ज्या तापलेल्या टाईल्सवर पीडित मुलाला आरोपीने बसविले, तो टाईल्सचा तुकडा पोलिसांनी जप्त केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस योग्य तपास करीत आहे, असे सांगितले जात असले तरी या प्रकरणाचा पुढील तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांना सोमवारी क्राईम मिटींग आटोपल्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास या प्रकणातील अधिक माहितीसाठी फोन केला असता त्यांनी त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हे प्रकरण पुढे आणखी कुठले नवीन वळण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटत असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी केली आहे.
जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले
या प्रकरणातील पीडित मुलाला सुरूवातीला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तर या संबंधी अधिक माहिती विचारण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे अधिकची माहिती मिळू शकली नाही.
आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचाच
आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे याला आर्वी पोलिसांनी जेरबंद करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. आरोपपत्र दाखल झाल्यावरच तो कारागृहातून बाहेर येईल, असे सांगण्यात येत असले तरी अमोल ढोरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. उमेश उर्फ अमोल ढोर याच्याविरुद्ध दारूविक्रीचे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Deliver a tyrannical prisoner to a jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.