Complete the water works by March 30 | पाणीपुरवठ्याची कामे ३० मार्चपर्यंत पूर्ण करा
पाणीपुरवठ्याची कामे ३० मार्चपर्यंत पूर्ण करा

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे. तसेच पाणी टंचाई आराखड्याचा टप्पा दोनमधील उपाययोजनेची कामे ३० मार्चपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भिमनवार यांच्या अध्यतेखाली जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम जलाशयातील उपयुक्तसाठा ६८.४२० द.ल.घ.मी. असून एकूण तो साठवण क्षमतेच्या केवळ १३ टक्केच आहे. धाम प्रकल्पामध्ये ११.०२ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा शिल्लक असून त्याच पाण्याचा वर्धा शहर व लगतच्या गावामध्ये ३० जुनपर्यंत पुरवठा होणाहर आहे. ज्या गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते अशा गावांना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्त भेटी देऊन तातडीने तपासणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्या. ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहे, अशाच ठिकाणी विंधन विहिरी करण्यात याव्या. इतरत्र कुठेही विंधन विहिरी करू नये, असा सूचना जिल्हाधिकारी भीमनवार यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यात ६०२ गावांमध्ये ९५४ उपाययोजना प्रस्थावित करण्यात आल्या आहेत. यात जानेवारी मार्च या दुसºया टप्प्यात १९९ नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली. तर एप्रिल ते जुन या तिसºया टप्प्यात १३७ नळ पाणीपुरवठा योजनाची कामे प्रस्तावित आहे. सदर योजनांचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करावे. १३५ गावातील टप्पा तीन मधील १३७ विशेष दुरुस्तीच्या कामाचे आराखडे व अंदाजपत्रक २५ मार्चपर्यंत सादर करावे. या कामासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन प्राधान्याने टंचाईसदृश गावे घेण्यात यावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.


Web Title: Complete the water works by March 30
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.