शहरात विद्रूपीकरणाचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:39 AM2018-05-12T00:39:00+5:302018-05-12T00:39:00+5:30

पावसाळ्याच्या सुरूवातीला पालिकेच्यावतीने मोठा निधी खर्च करून शहरातील मोठे व मध्यम नाले स्वच्छ करण्यात येतात. परंतु, सध्या शहरातील विविध मंगल कार्यालयांमधील कचरा व उर्वरित अन्न थेट शहरातील मोकळ्या मैदानांसह मोठाल्या नाल्यांमध्ये टाकले जात असल्याने हा प्रकार शहराच्या विद्रूपिकरणास कारणीभूत ठरत आहे.

City vandalism vacancy | शहरात विद्रूपीकरणाचा सपाटा

शहरात विद्रूपीकरणाचा सपाटा

Next
ठळक मुद्देनाकाला रूमाल लावून करावी लागते ये-जा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्याच्या सुरूवातीला पालिकेच्यावतीने मोठा निधी खर्च करून शहरातील मोठे व मध्यम नाले स्वच्छ करण्यात येतात. परंतु, सध्या शहरातील विविध मंगल कार्यालयांमधील कचरा व उर्वरित अन्न थेट शहरातील मोकळ्या मैदानांसह मोठाल्या नाल्यांमध्ये टाकले जात असल्याने हा प्रकार शहराच्या विद्रूपिकरणास कारणीभूत ठरत आहे. सदर कचऱ्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
वर्धा शहरासह परिसरात सुमारे ३० मंगलकार्यालयांसह लॉन आहेत. जी मंगलकार्यालये व लॉन वर्धा न.प.च्या हद्दीत येता अशांना यापूर्वी न.प.च्या स्वच्छता विभागाने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या; पण सध्यास्थितीत पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे सदर व्यावसायिकांकडून दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे दिसून येते.
अनेक मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर गोळा होणारा कचरा व उर्वरित अन्न सध्या थेट मंगल कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानांमध्ये टाकले जात आहे. इतकेच नव्हे तर काही जण सदर कचरा थेट नाल्यांमध्ये टाकत असल्याने ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिकांकडून सुरू असलेला हा मनमर्जी कारभार शहराच्या विद्रूपिकरणात भर टाकणारा ठरत आहे. सदर कचऱ्यामध्ये सर्वाधिक पूर्णपणे न जळणारा, न नष्ट होणाऱ्या प्लास्टिकचा समावेश असल्याचे दिसून येते. सदर प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून तात्काळ पालिकेच्या स्वच्छता विभागातील वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
नाकाला रूमाल लावून करावी लागते ये-जा
शहरातील गणेश टॉकीज परिसरातून पुलफैलकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यात काही लॉन व मंगल कार्यालय व्यावसायिकांकडून कार्यक्रम संपल्यानंतर लॉन व कार्यालयांमधील उर्वरित अन्न व कचरा टाकल्या जात आहे. या उर्वरित अन्नाच्या दुर्गंधीमुळे सदर परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच पुढील प्रवास करावा लागत आहे.

सोमवारपासून न.प. स्वच्छता व आरोग्य विभागाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान पाहणी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- प्रवीण बोरकर,
आरोग्य विभाग प्रमुख, न.प. वर्धा.
वर्धा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शेजारून पुलफैलकडे जाणाऱ्या मार्गावर गणेश टॉकीज जवळील नाल्यात लॉन व मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर कचरा टाकल्या जात आहे. या कचऱ्यात उर्वरित अन्न तसेच प्लास्टिकचा सर्वाधिक समावेश राहतो. सदर प्रकारामुळे नाला बुजण्याची भीती बळावत आहे.

Web Title: City vandalism vacancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.