अयोध्येत श्रीरामांच्या भाळी प्रथमच सूर्यकिरणांचा टिळा; रामनवमीच्या दिवशी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 08:30 AM2024-04-18T08:30:23+5:302024-04-18T08:30:39+5:30

श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर अयोध्येत बुधवारी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

In Ayodhya, Sri Rama's spear was the first to receive the sun's rays A unique confluence of science-technology and spirituality on Ramnavami day | अयोध्येत श्रीरामांच्या भाळी प्रथमच सूर्यकिरणांचा टिळा; रामनवमीच्या दिवशी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम 

अयोध्येत श्रीरामांच्या भाळी प्रथमच सूर्यकिरणांचा टिळा; रामनवमीच्या दिवशी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम 

अयोध्या : श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर अयोध्येत बुधवारी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ऑप्टोमेकॅनिकल तंत्रज्ञानाच्या मदतीने राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा सूर्यटिळा सोहळा पार पडला. या तंत्रज्ञानाच्या मदतीने बुधवारी दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे श्रीरामाच्या मूर्तीच्या कपाळावर पोहोचली. हा देखणा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अयोध्येत राम मंदिर उभारतानाच, रुरकीच्या सीएसआयआर-सीबीआरआयचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. डी. पी. कानुनगो यांच्या नेतृत्वात मंदिराच्या छतावर बसविलेल्या ऑप्टोमॅकेनिकल यंत्रणा बसविण्यात आली. त्यातील उपकरणाच्या लेन्सवर सूर्याची किरणे पडल्यावर ती परावर्तीत होऊन ती पितळीच्या पाइपद्वारे गाभाऱ्यापर्यंत आली. तेथील लेन्समधून पुन्हा परावर्तीत होत ती थेट प्रभू श्रीरामाच्या कपाळापर्यंत पोहोचली. दुपारी १२ च्या ठोक्याला मंदिरातील दिवे बंद करण्यात आले आणि अवघ्या काही सेकंदात रामाच्या मूर्तीला सूर्यटिळा लागला. जवळपास तीन मिनिटे सूर्याची किरणे मूर्तीच्या कपाळावर पडली होती. त्यानंतर मंदिरात आरती करण्यात आली. नियाेजनानुसार श्रीरामाच्या मूर्तीला दुपारी १२:०० वाजता सूर्यटिळा करण्यात आला. तो होताच गर्भगृहाबाहेर थांबलेल्या भाविकांनी भगवान रामाचा जयघोष केला, तर पुजारी आत आरती करत होते. 

बुधवारी दुपारी घड्याळात बरोबर १२ वाजले अन् अयोध्येतील राम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीवर अशाप्रकारे सूर्यटिळा लागला. या सोहळ्यासाठी श्रीरामाच्या मूर्तीला मौल्यवान रत्नांनी सजविलेला मुकूट बसविण्यात आला होता. यापुढे दरवर्षी श्री रामनवमीला दुपारी १२:०० वाजता हा याेग येईल, असे सीएसआयआर - सीबीआरआय, रुरकीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. डी. पी. कानुनगो यांनी सांगितले.

अद्भूत क्षणाचे साक्षीदार झालो : पंतप्रधान मोदी
नलबाडीच्या सभेनंतर मला अयोध्येतील रामलल्लाच्या सूर्यटिळ्याच्या अद्भूत आणि अद्वितीय क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले. हा बहुप्रतीक्षित क्षण सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. हा सूर्यटिळा विकसित भारताच्या प्रत्येक संकल्पाला आपल्या दिव्य ऊर्जेने उजळून टाकेल, असे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट केली. 

महात्मा गांधींच्या संकल्पनेतील राम हवेत 
प्रभू श्रीराम यांच्याबाबत महात्मा गांधी यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी. जनतेने खरा रामभक्त व राजकीय रामभक्त यांच्यातील फरक ओळखावा, हीच त्यांच्याप्रति खरी श्रद्धा ठरेल. - मनोज झा, राजद नेते
प्रभू श्रीराम हे सत्तेसाठी नव्हे, तर सत्यासाठी लढले. त्यामुळे आम्ही त्यांची पूजा करतो. - प्रियंका गांधी, काँग्रेस नेत्या
मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने दिलेला शब्द पाळण्यासाठी सत्ता त्यागली होती, आता मात्र रामाच्या नावाने राजकारण करणारे सत्तेसाठी दिलेला शब्द त्यागतात. - जयराम रमेश, काँग्रेस नेते

तृणमूल काँग्रेसने काढली शाेभायात्रा 
रामनवमी निमित्त तृणमूल कॉंग्रेसच्या वतीने हावडा येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते खास पोशाखात सहभागी झाले होते. गतवर्षी रामनवमीला हावडा येथे दंगल झाली होती. पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद येथे रामनवमीच्या शाेभायात्रे दरम्यान स्फाेट झाला. यात एक महिला जखमी झाली. याचा पाेलिस तपास करत आहेत.

Web Title: In Ayodhya, Sri Rama's spear was the first to receive the sun's rays A unique confluence of science-technology and spirituality on Ramnavami day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.