उस्मानाबादेत बनावट नोटा बाळगणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 07:53 PM2019-03-27T19:53:25+5:302019-03-27T19:54:59+5:30

२५ हजाराचा दंडही ठोठावला

four people jailed who have made fake currency in Osmanabad | उस्मानाबादेत बनावट नोटा बाळगणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

उस्मानाबादेत बनावट नोटा बाळगणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

googlenewsNext

उस्मानाबाद : बनावट नोटा बाळगणाऱ्या चौघांना उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तसेच चौघांना एकूण २५ हजार रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे़ ही घटना कळंब येथे ७ मार्च २०१६ रोजी घडली होती़ 

याबाबत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता महेंद्र  देशमुख यांनी दिलेली माहिती अशी की, कळंब शहरातील जुनेद इस्माईल शेख यांच्या कापड दुकानात ७ मार्च २०१६ रोजी एक व्यक्ती व दोन महिलांनी ५०० रूपयांची बनावट नोट देऊन कपडे खरेदी करण्याचा प्रयत्न केला़ ती नोट बनावट असल्याचे सांगताच संबंधित व्यक्ती व महिला साहित्य टाकून पळून गेल्याची माहिती शेख यांनी कळंब पोलिसांना दिली होती़ घटनेची माहिती मिळताच कळंब ठाण्यातील पोउपनि अब्दुल हक्क कयुम सिध्दीकी यांनी कळंब येथील बाजारात जाऊन शेख यांनी दिलेली माहिती व वर्णनाच्या व्यक्तीसह महिलांना ताब्यात घेतले

त्यांची चौकशी केली असता दत्ता अशोक पवार (रा़ सिरसाव तांडा ता़परंडा) याच्याकडे एक हजार रूपयांच्या चार नोटा, पाचशे रूपयांच्या पंधरा नोटा आढळून आल्या़ लक्ष्मी दत्ता पवार या महिलेकडे एक हजार रूपयांच्या पाच, पाचशे रूपयांच्या सात नोटा मिळून आल्या़ तसेच ताई संजू पवार यांच्याकडे एक हजार रूपयांच्या पाच व पाचशे रूपयांच्या नऊ नोटा मिळून आल्या़ या नोटांची बँक कर्मचाऱ्यांमार्फत तपासणी केली असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले़ संबंधितांकडे चौकशी केल्यानंतर या नोटा अरूण रामा चव्हाण (रा़ सिरसाव ता़बार्शी) हा पुरवत असल्याचे समोर आले़ पोलिसांनी चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याच्याकडूनही बनावट नोटा जप्त केल्या़ संबंधित व्यक्ती बनावट नोटा खऱ्या भासवून साहित्य खरेदी करीत असल्याची तक्रार पोउपनि अब्दुल सिध्दीकी यांनी कळंब ठाण्यात दिली होती़ यावरून संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़

या प्रकरणाच्या तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते़ या प्रकरणाची उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी झाली़ सरकार पक्षाकडून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी काम पाहिले़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांनी आरोपी अरूण रामा चव्हाण व दत्ता अशोक पवार यांना तीन वर्षे, सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ तसेच आरोपी लक्ष्मी दत्ता पवार, ताई संजू पवार यांना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी अडीच हजार रूपयांचा दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्याची माहिती अ‍ॅड़ देशमुख यांनी दिली़

सात जणांची साक्ष
या प्रकरणात सरकार पक्षाकडून सात साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले़ तसेच नाशिक येथील करन्सी नोट प्रेस येथील डेप्युटी मॅनेजर यांची साक्ष नोंदविण्यात आली़ साक्षीदारांच्या पुराव्यातून जप्त केलेल्या नोटा या बनावट असल्याचे सिध्द झाले़

Web Title: four people jailed who have made fake currency in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.