यवतमाळचा पादत्राणे विक्रेता ठरला लोकप्रिय गझलकार

By admin | Published: February 7, 2017 03:47 AM2017-02-07T03:47:29+5:302017-02-07T03:47:29+5:30

पु.भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली : यवतमाळ येथील एका छोट्याशा गावातून आलेले आबीद शेख यांनी ‘सुगंधी बाग आहे, ती तिला माहीत नाही

Yavatmal's footwear became a popular seller | यवतमाळचा पादत्राणे विक्रेता ठरला लोकप्रिय गझलकार

यवतमाळचा पादत्राणे विक्रेता ठरला लोकप्रिय गझलकार

Next

पु.भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली : यवतमाळ येथील एका छोट्याशा गावातून आलेले आबीद शेख यांनी ‘सुगंधी बाग आहे, ती तिला माहीत नाही’, ही गझल अखिल भारतीय साहित्य संमेलनात सादर केली आणि प्रेक्षकांकडून वन्स मोअर मिळविला. याच गावात पादत्राणे विक्रीच्या दुकानात ते काम करतात. त्यांच्यामध्ये असलेल्या कलाकाराला तेथे वाव मिळाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सावना गावात आबीद राहत असून त्यांचे सर्व शिक्षण तेथेच झाले. ते शालेय जीवनात नाटक लिहीत असत. त्यांचे वडील मनसुख यांना हिंदी गझल आवडत असे. त्यामुळे लहानपणापासून घरात गझलचे वातावरण होते.
महाविद्यालयीन जीवनात त्यांना एकदा भीमराव पांचाळे यांनी गायिलेली आणि सुरेश भट यांची ‘आसवांचे जरी हसे झाले, हे तुला पाहिजे तसे झाले’ ही गझल ऐकण्याची संधी मिळाली. ही गझल त्यांना प्रेरणा देणारी ठरली. पूर्वी केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गझल लिहीत होतो. पण, भटांची गझल ऐकल्यावर मराठी गझल लेखनाकडे वळल्याचे ते म्हणाले.
माझ्या लेखनावर गावातून प्रतिक्रिया येत नव्हत्या. माझी एक गझल भीमराव यांनी संगीतबद्ध करून उमरखेड येथील एका मैफलीत ऐकवली. ती गझल झाल्यावर भीमराव यांनी मला स्टेजवर बोलावले आणि आपल्या अंगावरील शाल काढून माझ्या खांद्यावर दिली. तो क्षण माझ्या दृष्टीने महत्त्वाचा होता. या प्रसंगाने मनोबल वाढण्यास मदत झाल्याचे आबीद यांनी सांगितले.
ते म्हणतात, अनेक गझल संमेलनांना ते गेले आहेत. खेडेगावात गझलचे फारसे कार्यक्रम होत नाही. पुणे, मुंबई येथे गझलचा जाणकारवर्ग आहे. कवितेची एक वेगळी थीम असते, तर गझल ही वेगवेगळ्या थीममध्ये तयार होते. गझल ही एक स्वतंत्र कविता आहे. या साहित्य संमेलनात मला कोणी बोलावले, याविषयी मला काहीच माहीत नाही. विदर्भ साहित्य संघाकडून मला पत्र आले आणि मी येथे आलो. संमेलनात गझलला स्थान मिळाले आहे, ही अत्यंत चांगली बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)

Web Title: Yavatmal's footwear became a popular seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.