चौथी सीट घेताय तरी भाडेवाढ का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:12 AM2018-07-26T00:12:32+5:302018-07-26T00:12:44+5:30

डोंबिवलीतील प्रवाशांचा सवाल; नियमानुसार रिक्षा चालवण्याची मागणी

Why take the fourth seat, but the hike? | चौथी सीट घेताय तरी भाडेवाढ का?

चौथी सीट घेताय तरी भाडेवाढ का?

डोंबिवली : रिक्षात चालकाशेजारी चौथा प्रवासी घेणे बेकायदा आहे. असे असतानाही शहरातील शेअर पद्धतीने रिक्षा चालवणारे सर्रासपणे चौथे सीट घेऊन स्वत:चा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहेत. चौथ्या सीटमुळे त्यांची आर्थिक तूट भरून निघत असतानाही ते भाडेवाढीसाठी आग्रह धरतात, हे किती सयुक्तिक आहे, असा सवाल डोंबिवलीतील प्रवाशांनी केला.
‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये बुधवारी प्रसिद्ध झालेल्या ‘डोंबिवलीत रिक्षा महागणार’ या वृत्ताची दखल घेत प्रवाशांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
रिक्षात चौथे सीट घेणे, बेकायदा वाहतूक करणे, नियमांचे उल्लंघन करणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, यावर संघटनांचा अंकुश आहे का? अनेकदा सायंकाळी, रात्री रिक्षा मिळत नाहीत. अशा वेळी संघटना रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी का प्रयत्न करत नाहीत. जवळचे भाडे काही रिक्षाचालक घेत नाहीत. त्यामुळे कुटुंबासह बाहेर पडलेल्या नागरिकांनी पंचाईत होते. रिक्षाचालकांच्या या मनमानी कारभाराबद्दल आरटीओ अधिकारी काही कडक उपाययोजना करणार आहे की नाही, अशा मुद्द्यांवरही चर्चा झाली.
शहरात काही रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे वाहतूककोंडीत भर पडते, त्याचे काय? त्यामुळे नियमानुसार भाडेवाढ झाली नाही, हे सांगत असतानाच संघटनांनी यासंदर्भातही गांभीर्याने विचार करायला हवा. आरटीओनेदेखील ‘मागेल त्याला परमिट’ या संकल्पनेनुसार रिक्षा वाहनांचे परमिट देण्यासाठी जेवढी मेहनत घेतली आहे, तेवढी यापुढे कोंडी होणार नाही, अनधिकृत रिक्षास्टॅण्ड सुरू होणार नाही, डोंबिवलीत पूर्णवेळ आरटीओ अधिकारी तसेच सिग्नल यंत्रणेसाठी पाठपुरावा आणि त्याची पूर्तता यासारख्या गंभीर विषयांकडे लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
आरटीओ कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत डोंबिवलीेतील भाडेवाढीला रिक्षाचालकांच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने विरोध केला. तरीही, बुधवारी सकाळी तेथील रिक्षाचालकांनी दोन रुपये जादा आकारले. त्याबद्दलही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

‘कमी भाडे आकारणी’
२०१४ मध्ये जे दरपत्रक जाहीर करणे अपेक्षित होते, ते आता तरी सर्व स्टॅण्डवर अधिकृतपणे लावावे, जेणेकरून आरटीओने सुचवलेल्या रिक्षाच्या दरवाढीत आणि आता रिक्षाचालक आकारत असलेले सध्याचे भाडे, यामधील तफावत लक्षात येईल. त्यात सुचवलेल्या भाड्यापेक्षाही कमी भाडे सध्या रिक्षाचालक आकारत असल्याचा दावाही रिक्षा संघटनांच्या पदाधिकाºयांनी बैठकीत केला.

Web Title: Why take the fourth seat, but the hike?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.