‘त्या’ कामाला मुहूर्त कधी लाभणार? सावित्रीबाई नाट्यगृहातील कामाचे कार्यादेश अद्याप नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 03:12 AM2018-11-07T03:12:05+5:302018-11-07T03:12:32+5:30

देखभाल दुरूस्तीसाठी एप्रिल २०१७ पासून बंद असलेले येथील आचार्य अत्रे रंगमंदिर तब्बल दीड वर्षांनी खुले झाले. त्याच्या दुरूस्तीकामातील विलंबाचा हा कित्ता आता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या बाबतीतही गिरवला जात आहे.

When will that work be done? The work order of the Savitribai Natyagrahaha is not yet | ‘त्या’ कामाला मुहूर्त कधी लाभणार? सावित्रीबाई नाट्यगृहातील कामाचे कार्यादेश अद्याप नाही

‘त्या’ कामाला मुहूर्त कधी लाभणार? सावित्रीबाई नाट्यगृहातील कामाचे कार्यादेश अद्याप नाही

Next

- प्रशांत माने
डोंबिवली - देखभाल दुरूस्तीसाठी एप्रिल २०१७ पासून बंद असलेले येथील आचार्य अत्रे रंगमंदिर तब्बल दीड वर्षांनी खुले झाले. त्याच्या दुरूस्तीकामातील विलंबाचा हा कित्ता आता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या बाबतीतही गिरवला जात आहे. नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बदलण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नाट्यगृह बंद आहे. परंतु, दोन महिने उलटायला आले, तरी या कामाचे कार्यादेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आलेले नाहीत. कामाला होत असलेल्या विलंबामुळे डोंबिवलीकरांची सांस्कृतिक उपासमार सुरूच असून रसिकांसह कलाकरांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे. साधारण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केडीएमसीकडून दुरूस्तीसाठी अत्रे नाट्यगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नव्हती. हे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल दीड वर्ष लागले. या नाट्यगृहाचा पडदा अखेर महापालिकेच्या वर्धापनदिनी १ आॅक्टोबरला उघडण्यात आला. तर डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृह हे नवीन वातानुकूलित यंत्रणा बसवण्यासाठी ८ सप्टेंबरपासून बंद ठेवण्यात आले आहे. गणेशोत्सवात नाट्यप्रयोग बंद असतात, ही संधी महापालिकेकडून साधण्यात आली खरी, परंतु, आता दिवाळीचा कालावधी उलटून जाऊ लागला तरी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. यासंदर्भातील निविदा प्रक्रियाही पार पडून या कामाला स्थायीची मान्यताही मिळाली आहे. परंतु, कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. नाट्यगृहामधील वातानुकूलित यंत्रणा बिघडल्याने गेल्यावर्षीच्या दिवाळीपासून भाडेतत्त्वावर यंत्रणा चालवली जात होती. तिची मुदत ७ सप्टेंबरला संपुष्टात आल्याने नवीन यंत्रणा बसविण्यासाठी नाट्यगृह बंद करण्यात आले. या कामासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यामुळे नाट्यगृह नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र, अद्याप कामच सुरू न झाल्याने ही अपेक्षा फोल ठरली. परिणामी, आता फेब्रुवारी अखेरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. फुले नाट्यगृह एमआयडीसी भागात आहे.

अत्रे रंगमंदिराच्या धर्तीवर चिलर यंत्रणा

रासायनिक कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाचा फटका नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेला बसला असून ती खराब झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता नवीन यंत्रणा लावताना अत्रे रंगमंदिराच्या धर्तीवर चिलर वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

दरम्यान, सोमवारी रंगभूमीदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी कलाकारांनी नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती उपस्थित महापालिका अधिकाºयांकडे केली. लवकरात लवकर यंत्रणा बसविण्यात यावी अशी मागणी केली आहे.

आम्ही कलावंत महाराष्ट्रभर आमचे प्रयोग करत असतो जेव्हा नाट्यगृहांची दुरूस्तीची कामे घेतली जातात ती दिलेल्या मुदतीत होणे अपेक्षित होते. परंतु विलंब लागत असल्याने कलावंतांचीही मोठी गैरसोय होते आणि रसिकांचीही परवड होते. आता सावित्रीबाई नाट्यगृहाच्या कामासाठी चार महिन्यांचा कालावधी सांगितला जात आहे. त्या मुदतीत काम व्हावे ही अपेक्षा आहे.
- आनंद म्हसवेकर, लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य निर्माता संघ सदस्य

कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, यासंदर्भातला करारनामा होऊन पुढील आठवड्यापर्यंत कार्यादेश दिले जातील, कामाला विलंब लागणार नाही.
- प्रमोद कुलकर्णी, शहर अभियंता, केडीएमसी

Web Title: When will that work be done? The work order of the Savitribai Natyagrahaha is not yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे