काय आहे मुलांसाठीचा कायदा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:40 PM2019-06-10T23:40:07+5:302019-06-10T23:40:13+5:30

हरवलेलं मुक्काम पोस्ट

What is the Act for Children? | काय आहे मुलांसाठीचा कायदा ?

काय आहे मुलांसाठीचा कायदा ?

googlenewsNext

विजय जाधव

बालकांसंदर्भात विचार करताना प्रत्येक मोठी व्यक्ती आम्ही मुलांच्या भविष्याचा विचार करतो आहोत, असे सांगते. परंतु, मुलांना हे मान्य आहे का, याचा मात्र विचार करत नाही. याबाबत, आपण अनेक वेळा बोललो आहोत, परंतु काही पालकांच्या वागण्यामुळे किंवा त्यांच्या काही निर्णयांमुळे मुलांना खूपच त्रास होतो. तो त्रास शारीरिक किंवा मानसिक तर असतोच, परंतु सामाजिकसुद्धा असतो. मुलंही समाजात वावरतात. पालकांच्या वागण्याने मुलांना समाजात वावरताना विविध प्रश्नांना किंवा अनेक टीकांना सामोरे जावे लागते.
मुलांच्या या समस्येविषयी कायदे काय सांगतात, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. बालन्याय अधिनियम २०१५ या कायद्याच्या प्रकरण-९ मध्ये बालकांसंदर्भातील इतर अपराधांबाबतच्या तरतुदी केल्या आहेत. कलम ७४ ते ८९ मध्ये त्या दिलेल्या आहेत.
(लेखक महाराष्टÑ राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य आहेत.) 

कलम ७४ बालकाची ओळख उघड करण्यावर प्रतिबंध
कोणत्याही वर्तमानपत्र, मासिक, वार्तापत्र, वृत्तवाहिनीमध्ये कायद्याशी संघर्ष करत असलेल्या बालकाचे नाव, पत्ता किंवा कोणताही तपशील उघड केला जाता कामा नये. कोठेही तो तपशील प्रकाशित करता येत नाही, परंतु ज्यांना अधिकार आहे, त्यांच्या परवानगीने व बालकांच्या हिताचे असल्यास लेखी कारणे नोंदवून परवानगी देता येऊ शकते. अनेक ठिकाणी या कायद्याचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसते. समतोलच्या मन:परिवर्तन शिबिर समारोपामध्ये येणाऱ्या मान्यवरांना, समतोल मित्रांना याची सूचना आम्ही वारंवार करत असतो. परंतु, याबाबतीत आणखी जनजागृती होणे गरजेचे व आवश्यक आहे, असे दिसते. यासाठी दंडही आहे आणि शिक्षाही आहे, परंतु जनजागृती झाली तर याबाबतीतील समस्या कमी होण्यास नक्की मदत होऊ शकते.

कलम ७५ बालकाला क्रूरपणे वागविण्याबद्दल शिक्षा
बालकांचा ताबा किंवा नियंत्रण असलेल्या कोणत्याही व्यक्तीने जर बालकावर हल्ला केला, गैरवापर केला, त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तेही जाणीवपूर्वक केले. एकूणच बालकाला शारीरिक, मानसिक त्रास होईल, असे वागले तर त्या व्यक्तीला शिक्षा व दंड देण्याची तरतूद आहे. आजही अनेक पालक आपल्या मुलांना आपण त्यांचे मालक असल्यासारखे वागवतात. मुलांबाबतीत अनेक मोठ्या व्यक्तींवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाल्याची फार कमी नोंद आहे. जर आपण यासंदर्भात जागृती वाढवली तर अनेक मुलांना सुरक्षित वाटेल. शिवाय, मोठ्या व्यक्तींना जे बालकांना क्रूरपणे वागवतात, त्यांना शिक्षा होऊ शकते.

कलम ७६ भीक मागण्याच्या कामासाठी बालकांना राबविणे
जे कोणी मुलांना भीक मागण्याच्या उद्देशाने कामाला लावतील, त्यांचा उपयोग करून घेतील, अशांनाही शिक्षा होऊ शकते व दंडही होऊ शकतो. परंतु, याबाबत आमच्याकडे सुरक्षायंत्रणेत जागृती करण्याची गरज आहे. शिवाय, याबाबतीत व्यवस्था व सहकार्य शासकीय स्तरावर असणे गरजेचे आहे.

कलम ८९ बालकाने केलेला गुन्हा
कोणतेही बालक जे या प्रकरणाखाली अपराध करते, अशा बालकाला कायद्याशी संघर्ष करणारे बालक समजले जाते. म्हणजेच मुले गुन्हेगार नसतात. आपल्या समाजात मुलांविषयी बरेच गैरसमज आहेत. आपण हा कायदा समजून न घेतल्याने अनेक अडचणी येतात, परंतु समजून घेतले तर बालक व पालक यांच्यातील समन्वय वाढेल. शिवाय, मुलांच्या समस्यांवर चर्चा होत राहतील. अनेक मुलांना त्यामुळे न्याय मिळू शकेल आणि बालप्रेमी समाज तयार होण्यास प्रतिसाद मिळेल.

कलम ८१ कोणत्याही बालकांची विक्र ी करणे किंवा मिळवणे
जी व्यक्ती कोणत्याही हेतूने बालकांची विक्र ी करेल किंवा त्यांना खरेदी करेल अशा कोणत्याही व्यक्तीला पाच वर्षापर्यंत कठोर शिक्षा होऊ शकते.

अनेक कलमे यामध्ये लिहिली नाहीत. कारण, मला वाटते महत्त्वाची काही कलमे समाजाच्या लक्षात येणे आवश्यक आहे. जसे मुलांना भीक मागताना आपण रोज बघतो, मुलांची विक्र ी होतानाचे वृत्त वाचतो. त्याचप्रमाणे मुलांना क्रूरपणे वागवताना आपण सोशल मीडियावर बघतो. हे सर्व बघताना, ऐकताना आपल्या संवेदनशीलता जागृत होतात, परंतु यासाठी काय करायचे म्हणून ठरावीक कलमांचा व त्यासंदर्भातील माहितीचा उल्लेख केला आहे. समतोल या बाबतीत बालन्याय अधिनियम २०१५ व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण २०१२ यावर महानगरपालिका व जि.प. शाळांमध्ये जनजागृती रक्षा अभियान म्हणून करत आहे. सध्या शाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. मुलांना शालेय वस्तू देण्याचा सपाटा सुरू आहे, परंतु ज्या शाळांमध्ये आपण मुलांना दाखल करणार आहात, मग ती शाळा इंटरनॅशनल असो किंवा साधी जि.प.ची असो, प्रत्येक शाळेत बालकांचे कायदे व त्याबद्दलची माहिती शाळेत दिली जाते का? याची जरूर माहिती घ्यावी. कारण, आपले मूल सुरक्षित, संरक्षित असायला तर हवेच, शिवाय त्याच्यासाठी असलेल्या कायद्यांची त्याला माहिती असणे गरजेचे व आवश्यक आहे. यासाठी आपण मोठ्या व्यक्तींनी पुढे येऊन बालप्रेमी बनले पाहिजे.

Web Title: What is the Act for Children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे