'भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही जागा आम्हीच जिंकू'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:07 AM2019-06-16T00:07:32+5:302019-06-16T00:09:10+5:30

पालकमंत्र्यांचा निर्धार; कपिल पाटील यांचा भिवंडीत सत्कार

'We will win all six seats in Bhiwandi Lok Sabha constituency' | 'भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही जागा आम्हीच जिंकू'

'भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही जागा आम्हीच जिंकू'

Next

भिवंडी : लोकसभेच्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील चारही जागा जिंकून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी इतिहास घडविला. आता तोच कल कायम ठेवून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघावर विजय मिळवू, असा निर्धार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी येथे व्यक्त केला.

तालुक्यातील वळ येथे खासदार कपिल पाटील यांचा नागरी सत्कार झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, ज्योती ठाकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, आमदार गणपत गायकवाड, रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, नरेंद्र पवार, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, जगन्नाथ पाटील, पंचायत समितीच्या सभापती रवीना जाधव, विश्वास थळे, महेंद्र गायकवाड, मदनबुवा नाईक, देवानंद थळे, संतोष शेट्टी, दयानंद चोरघे आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुतीने एकत्र लढवाव्यात. त्यातून कार्यकर्त्यांमधील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या मोठ्या कुटुंबात मतभेद होतात. पण काही काळानंतर सर्व एकत्र येतात. त्याच धर्तीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महायुतीचे कार्य केले. आता खासदार पाटील यांची जबाबदारी वाढली असून, तीन खासदारांनी एकत्र येऊन केंद्रातील विविध प्रकल्प राबवून विकास करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.

भिवंडीतील दोन मतदारसंघात महायुतीला मिळालेली मतांची पिछाडी भरून काढण्यासाठी एक दिलाने काम करावे लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले. कल्याण-मुरबाड रेल्वे, कल्याण-मुरबाड रस्ता आणि माळशेज घाटात बोगदा आदी कामे सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

कार्यकर्त्यांचे सर्जिकल स्ट्राइक
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपवर खोटे मेसेज व्हायरल केले जात होते. मतदानाच्या दिवशीही थेट जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नावाने मेसेज व्हायरल झाला होता. मात्र, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी थेट सर्जिकल स्ट्राइक करून विजय मिळवून दिला.

Web Title: 'We will win all six seats in Bhiwandi Lok Sabha constituency'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.