'महाराष्ट्र साहित्य परिषदेला आम्ही मानत नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:45 AM2019-03-11T00:45:32+5:302019-03-11T00:45:49+5:30

कोमसापतर्फे ठाण्यात रंगला वार्षिक पुरस्कार सोहळा, डॉ. अनंत देशमुख यांचा गौरव

'We do not believe in Maharashtra Sahitya Parishad' | 'महाराष्ट्र साहित्य परिषदेला आम्ही मानत नाही'

'महाराष्ट्र साहित्य परिषदेला आम्ही मानत नाही'

Next

ठाणे : आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेला (मसाप) मुळात मानतच नाही. जिथे भारताची घटना बदलली तिथे मसापची कालबाह्य झालेली १९०५ ची जुनी घटना कोण मानणार? आजची पिढी या कालबाह्य झालेल्या घटना मानणार नाही, ते स्वत:चे स्थान स्वत: निर्माण करणार आणि ते तुम्हाला मान्य करायला लावणार, असे प्रतिपादन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मसापला दिले.

कोमसापतर्फे रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालयात वार्षिक वाड्.मयीन आणि वाड्.मयेतर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मश्री मधु मंगेश कर्णिक बोलत होते. ते म्हणाले की, कोमसापमधून चांगले कवी, लेखक निर्माण होत आहेत. आम्हाला कोणाची मान्यता असो वा नसो आम्ही आमचे काम सुरूच ठेवणार आहोत. महाराष्ट्रात शंभर वर्षे पूर्ण झालेल्या साहित्य परिषदा आहेत. त्यांना जिथे केशवसुतांचा जन्म झाला अशा त्यांच्या मालगुंड या जन्मस्थानी जाऊन दर्शन घेण्याची बुद्धी झालेली नाही. मुळात साहित्याला पर्यायच नाही. जगातील कुरूपता निर्माण करण्याचे काम साहित्यिकच करू शकतो, कारण तो सौंदर्यवादी असतो. मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून का मागावी, तसे मागणे म्हणजे ती भाषा अभिजात नाही असे कबूल करणे. पण मराठी भाषा ही अभिजातच आहे. ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखोबा निर्माण झाले तेथील भाषा अभिजात नाही का? महाराष्ट्र सरकारचे हजारो कोटींचे बजेट असताना मराठी भाषेसाठी ५०० कोटी काढता येत नाही का? अभिजात भाषेसाठी केंद्र सरकारकडे का जावे, तिथे ठामपणे सांगितले पाहिजे. आमची भाषा अभिजातच आहे. मराठी भाषेसाठी नियम झाला पाहिजे, पहिली पासून मराठी भाषा अनिवार्य झाली पाहिजे. मंत्रालयात सनदी अधिकारी, सल्लागार, सहसल्लागार, मुख्य सल्लागार, आयुक्त त्यातील ८० टक्के अधिकारी हे परप्रांतीय असताना ते उत्तम मराठी बोलतात कारण महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा कायदा आहे. मग उर्वरित मराठी अधिकारी आपली मातृभाषा का बोलत नाहीत? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, ज्येष्ठ समीक्षक व चरित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल कोकण साहित्य भूषण पुरस्काराने तर निद्रानाश या कवितासंग्रहासाठी डॉ. महेश केळुस्कर यांना कविता राजधानी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, कोकणातील साहित्यिकांना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाड्.मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक-एकांकिका, दृकश्राव्य - कला - सिनेमाया साहित्य प्रकारांना पुरस्कार दिले गेले. यावेळी नमिता कीर, रेखा नार्वेकर, अशोक ठाकूर, न्या. भास्कर शेट्ये, अरुण नेरुरकर, रघुनाथ पाटील आदी उपस्थित होते.

नाटककाराला साहित्यिक न मानण्याची चूक - प्रेमानंद गज्वी
नाटककाराला साहित्यिक न समजण्याची चूक आपल्याकडे वर्षानुवर्षे होत आहे, अशी खंत व्यक्त करीत साहित्य व नाट्यसंमेलन ही एकत्र व्हावीत अशी अपेक्षा नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली. ही संमेलने एकत्र झाल्यास ती तीन दिवसांऐवजी पाच दिवसांची करावी, यामुळे मंडपाचा खर्चही वाचेल. संमेलनात असुविधा असतील तर ते पाहण्याचे काम संमेलनाच्या अध्यक्षाचे नसून महापालिकेचे आहे असेही ते म्हणाले. अ. भा. मराठी साहित्य परिषदेची मध्यवर्ती शाखेने कोमसापला समाविष्ट करून घ्यावे. जर घटना बदलली जाते, मग कोमसापला समाविष्ट का करून घेतले जात नाही? कोकण हा महाराष्ट्राचा भाग नाही का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. आपल्याकडे साहित्याचे अनेक प्रकार आहेत. पण मी मनोरंजन, प्रयोगशील आणि बोधी हे तीनच प्रकार मानतो, असे ते म्हणाले.

Web Title: 'We do not believe in Maharashtra Sahitya Parishad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.