कातकरीवाडीत पाणीटंचाई, ग्रामस्थांची होतेय वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:01 PM2019-05-30T23:01:20+5:302019-05-30T23:02:05+5:30

एकमेव बोअरवेलचे पाणी आटले : नदीकिनारी असलेल्या गावांतही चिंता

Water scarcity in the Katkariwadi, due to villagers | कातकरीवाडीत पाणीटंचाई, ग्रामस्थांची होतेय वणवण

कातकरीवाडीत पाणीटंचाई, ग्रामस्थांची होतेय वणवण

Next

जनार्दन भेरे 

भातसानगर : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई आता नदीकिनारी असलेल्या गावांमध्येही जाणवू लागली आहे. त्यातच, जर आता पावसाळ्याला उशीर झाला तर तालुक्यातील चित्र अतिशय भयावह असेल. यंदा पाणीटंचाईच्या समस्येने सर्वच गावांना ग्रासले असून त्यात आता तालुक्यातील ठिळे गावातील कातकरीवाडीची भर पडली आहे.

ठिळे गावच्या कातकरीवाडीत २५ ते ३० कुटुंबे राहतात. येथील लोकसंख्या १२५ च्या आसपास असून या वाडीसाठी एकमेव बोअरवेल आहे. अनेक दिवसांपासून या बोअरवेलला पाणी येणे बंद झाल्याने गावकऱ्यांची अडचण झाली. त्यांना दूरवरून पाणी आणणे भाग पडू लागले. त्यामुळे वाडीतील महिला हैराण झाल्या आहेत. मात्र, याच गावातील महेश पांडुरंग देसले यांनी या लोकांना मोफत पाणी देणे सुरू केले, ते आजतागायत. आजच्या टंचाईच्या काळात कुणीही एक हंडाभर पाणी देत नसतानाही या गृहस्थाने माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे.

आज वाडीत एकमेव विहीर असून तिने कधीच तळ गाठला आहे. जवळपास कुठेच पाण्याचा स्रोत नसल्याने वाडीतील ग्रामस्थांची गळचेपी झाली आहे. तीन दिवसांपूर्वी एक टँकर विहिरीत टाकला. मात्र, गेल्या दोन दिवसांत टँकर आला नसल्याचे उषा रवींद्र हिलम यांनी सांगितले.

दरम्यान, पाऊस लांबणार अशी चिन्हे दिसू लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाचीही पाणीपुरवठा करताना दमछाक होत आहे.

वाडीत प्यायलाच पाणी नसल्याने ती सर्व माणसे आमच्या बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी येतात. त्यांना आम्ही मोफत पाणी देतो. - मंजुळा देसले

या वाडीला टँकरने पाणी सुरू केले असून दररोज पाणी देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. - एम.बी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Web Title: Water scarcity in the Katkariwadi, due to villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.