सात सोसायट्यांमधील पाणी मीटर गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 03:19 AM2018-06-20T03:19:05+5:302018-06-20T03:19:05+5:30

सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये मीटरचोरीची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे.

Water meter in seven societies disappeared | सात सोसायट्यांमधील पाणी मीटर गायब

सात सोसायट्यांमधील पाणी मीटर गायब

Next

डोंबिवली : सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये मीटरचोरीची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे. शिवमंदिर पथ, श्रीखंडेवाडी आदी परिसरातील सात सोसायट्यांमधील मीटर आता चोरीला गेली आहेत. विविध पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत एफआयआर दाखल होऊनही चोरट्यांचा छडा लागलेला नाही. एकीकडे पोलिसांची उदासीनता दिसत असताना दुसरीकडे मात्र तक्रारदार असलेल्या सोसायटींमधील रहिवाशांची परवड होत आहे.
काही महिन्यांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, खंबाळपाडा, बाबासाहेब जोशी मार्ग, राजाजी पथ येथील सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले होते. पश्चिमेतील काही भागांमध्येही या चोरीच्या घटना घडल्या होत्या. एप्रिलपर्यंत २५३ मीटर चोरीला गेली होती. आजही या चोरीचे सत्र सुरूच असल्याने ही संख्या आता ३०० च्या आसपास पोहोचली आहे. मागील काही दिवसांमध्ये पूर्वेकडील श्रीखंडेवाडी, रघुवीरनगर, शिवमंदिर पथ, संगीतावाडी या भागांमधील सात सोसायट्यांमधील पाणीमीटर चोरीला गेली आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. मीटर चोरीमुळे सध्या किती प्रमाणात पाणी वापरले जाते, याची मोजदादच होत नाही. तर, मीटर चोरीला जात असल्याने पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे. नवीन मीटर लावण्यासाठी सोसायट्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.
दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटना पाहता संगीतावाडी, रघुवीरनगर रहिवाशी संघातर्फे स्थानिक पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार आहे. शहरात मीटर चोरीच्या घटना सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहेत, पण अद्यापपर्यंत त्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
>मीटरची चोरी भंगार विक्रीसाठी
चोरलेले मीटर अन्यत्र वापरता येत नाही. मीटर पितळ धातूचे आहे. पितळ्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरटे त्याची भंगारामध्ये विक्री करत असावेत, असा कयास मांडला जात आहे. यामागे मोठी टोळी सक्रीय असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे.
>चोरांचा छडा लागणे गरजेचे
मीटर चोरीच्या
घटनांमध्ये रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर परवड होत आहे. मीटर चोरून नेली जात असल्याने पाणीपुरवठाही खंडित होतो. पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होतो. रघुवीरनगर, संगीतावाडी प्रभागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यांची नोंद होत असताना चोरांचा छडा लागणे गरजेचे आहे, असे मत रहिवासी सागर घोणे आणि सौरभ नाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

Web Title: Water meter in seven societies disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.