वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक मामासाहेब दांडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 06:11 AM2018-04-22T06:11:41+5:302018-04-22T06:11:41+5:30

कॉलेजमध्ये मामा तत्त्वज्ञान विषय शिकवत असत, तर बाहेर कीर्तन-प्रवचन करत़ स.प़. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना गळ्यात वीणा घालून कीर्तन करताना पाहून शहाणेसुद्धा आश्चर्यचकित होत असत.

Warkari sect promoter, Mamaasaheb Dandekar | वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक मामासाहेब दांडेकर

वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक मामासाहेब दांडेकर

googlenewsNext

आधुनिक काळात वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे शं़ वा़ दांडेकर तथा मामासाहेब दांडेकर हे पालघरचे़ मामासाहेब दांडेकर म्हणजे वारकरी कीर्तनाचा आदर्श वस्तुपाठ! एकाचवेळी शैक्षणिक क्षेत्रात अध्यापनाचे, प्राचार्यपदाचे काम सांभाळताना तेथे तत्वज्ञान शिकवताना त्याच रसाळ वाणीने ते कीर्तन-प्रवचनाचे कामही पार पाडत. वेगवेगळ््या संस्था उभ्या करणाऱ्या, ग्रंथसंपदेची निर्मिती करणाºया मामांचे योगदान कधीही न विसरण्याजोगे आहे.

परमार्थाचे संस्कार घरातून मामासाहेबांना लहानपणापासून प्राप्त झाले होते़ आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याच्या पहिल्या बैठकीपासून मामासाहेब संस्थेत सहभागी होते. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, याविषयी ते आग्रही होते़ संस्थेचा हेतू, उद्देश, स्वरूप व अभ्यासक्रमाची दिशा इ़ विषय ठरवण्यात त्यांच्या अनमोल सूचना संस्थेला लाभल्या़ प्रत्यक्ष २४ मार्च १९१७ रोजी वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा पहिला ज्ञानेश्वरीचा वर्ग घेण्यासाठी सद्गुरू जोग महाराजांनी मामासाहेबांना मुद्दाम पुण्यावरून आळंदीला पाठवले होते़ स्थळ होते घासवाले धर्मशाळा व विद्यार्थी संख्या होती जेमतेम सहा़ संस्था स्थापनेपासून ते अगदी शेवटपर्यंत ते अध्यापक, सहचिटणीस, चिटणीस, अध्यक्ष अशा पदांद्वारे या ना त्या नात्याने संस्थेची सेवा करत राहिले. कॉलेजला सुटी असली म्हणजे मामा आळंदी, देहू व भंडाºयाच्या डोंगरावर एकान्तात ग्रंथाभ्यासासाठी जात असत. अर्थासह पारायणावर त्यांचा अधिक भर असे़ सद्गुरू जोग महाराजांच्या घरबसल्या सहवासातून ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, भागवत, गाथा इ. ग्र्रंथांचा सूक्ष्म अभ्यास, तर कॉलेजात गुरुदेव रानड्यांकडे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास या दोहोंचा मामासाहेबांच्या ठिकाणी अपूर्व मेळ होता. केवळ ज्ञानच नव्हे तर त्या तोडीचे त्यांचे आचरणही होते़ त्याकाळात महाराष्ट्रात जे थोर वक्ते होते, त्यामध्ये समन्वय व चिकित्सा, आचार व विचार इ़ सर्वच गोष्टींमुळे मामासाहेबांचे वेगळेपण उठून दिसे़ ज्या नूतन मराठी शाळेतून ते सुरुवातीला शिकले, त्याच शाळेतील एक थोर शिक्षक विनायकराव आपटे यांनी या विद्यालयाच्या इमारतीतच न्यू पूना कॉलेज सुरू केले होते़ त्यात सहकारी म्हणून अनेक स्वार्थत्यागी मंडळी होती़ या सर्वांनी मामांना सहकार्यासाठी बोलावले व त्यांनी होकार देऊन ३० मार्च १९२० ला शिक्षण प्रसारक मंडळाचे सभासदत्व स्वीकारले़ प्रारंभी अध्यापनाचा सर्व भार मामा व त्यांचे सहकारी प्रो़ ना़ ग़ नारळकर यांच्यावर पडला आणि या दोघांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली़
सद्गुरू जोग महाराजांच्या शिष्यचतुष्टयातील मामा वयाने सर्वात लहान. जोग महाराजांचे मामांवर विशेष प्रेम होते आणि मामासाहेबांचीही तशीच निष्ठा होती़ पंढरपुरातील पांडुरंगाचे दर्शन हरिजनांसाठी खुले केले, म्हणून काही सनातनी धर्ममार्तंडांनी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे नाही, असा पवित्रा घेतला़ मामा मात्र अपवित्राला पवित्र करणारा देव असतो, असे सांगत दर्शनाला गेले़ १९३४ साली मामासाहेब नूतन मराठी शाळेचे सुप्रिटेंडंट म्हणून काम पाहू लागले़ मराठी प्राथमिक शाळेत व्हिजिटर म्हणून काम करताना ते लहान मुलांमध्ये रमत. गीता जयंती, गणपती उत्सव असे ी नैतिक चारित्र्यवर्धक समारंभ त्यांनी वसतिगृहात सुरु केले़ वसतिगृहाची जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांच्या सहवासाची आठवण म्हणून त्यांच्या नावाने वादविवाद स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यास प्रा. दांडेकर कप बक्षीस देण्यात येऊ लागला़ १९४० च्या दरम्यान मुंबईतील माटुंगा येथे रुईया कॉलेजची स्थापना झाली आणि तेथे उपप्राचार्य म्हणून मामांची नेमणूक करण्यात आली़ मुंबईला जाताना त्यांनी अगोदरच प्रमुखांना सांगितले की, मी माझ्या पोशाखात कुठलाही बदल करणार नाही. त्यांचा होकार मिळाल्यावरच ते मुंबईस गेले़ याच काळात १९४३ साली वारकरी शिक्षण संस्थेचा रौप्यमहोत्सव थाटात साजरा झाला़ रुईया कॉलेजला पायावर उभे केल्यावर ते १९४५ साली स़.प. महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. कॉलेजमध्ये मामा तत्त्वज्ञान विषय शिकवत असत, तर बाहेर कीर्तन-प्रवचन करत़ स.प़. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना गळ्यात वीणा घालून कीर्तन करताना पाहून शहाणेसुद्धा आश्चर्यचकित होत असत. या कार्याच्या व्यापात त्यांनी कधीच आषाढीची पायी वारी चुकवली नाही. कॉलेजमध्ये प्राध्यापक असतानाही ते दरवर्षी पंढरपूरला वारीने जात व वारीहून आल्यावर विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून देत़ मामांजवळ वेळेचे अचूक नियोजन होते़ ते कडक शिस्तीचे भोक्तेही होते़ त्यामुळेच शैक्षणिक कार्याबरोबरच आळंदीतील संस्थेचे कार्य, कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रम ते पार पाडत़ वयाची ५५ वर्षे पूर्ण होताच १९५१ ला मामांनी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. इतर मंडळींनी त्यांना निवृत्त होऊ नये, म्हणून आग्रह केला़ पण, ते आग्रहाला बळी पडले नाहीत़ ‘उरलेलं आयुष्य हे अधिकाधिक समाजाच्या सेवेत घालवण्याविषयी ते आग्रही होते़ त्यातच, १९५२ साली लक्ष्मणबुवा इगतपुरीकर यांनी आपला देह ठेवला आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मामांकडे आली़ ती त्यांनी आनंदाने शेवटपर्यंत सांभाळली़ मामांची ग्रंथसंपदा मोठी होती़ सार्थ ज्ञानेश्वरी व तिची विस्तीर्ण प्रस्तावना ही त्यांच्या लेखनीतून साकारलेली होती़ १९५० साली ही ज्ञानेश्वरी त्यांनी संपादित केली. या सर्व ज्ञानेश्वरीचे कॉपीराइट्स-हक्क वारकरी शिक्षण संस्थेच्या नावे करून ठेवले़ आपल्या पश्चात या ज्ञानेश्वरीद्वारे संस्थेची सेवा घडो, हाच त्यांचा हेतू होता़ तसेच ज्ञानदेव चरित्र, ग्रंथ व तत्त्वज्ञान, ईश्वरवाद, अध्यात्मशास्त्राची मूलतत्त्वे, ज्ञानदेव व प्लेटो, वारकरी पंथाचा इतिहास, जोग म़ चरित्र असे अनेक ग्रंथ, तर कित्येक पुस्तकांना प्रस्तावना व इतर मासिकांकडून लेख इ़ परतत्त्वाला स्पर्श करणारे लिखाण त्यांनी केले़
जोग महाराजांपासून ते मामासाहेब दांडेकरांपर्यंत अनेक संतजनांनी वारकरी आध्यात्मिक परंपरेचे बीज महाराष्ट्रात रुजवले़ त्यात वारकरी शिक्षण संस्थेचा वाटा मोठा आहे़ वारकरी कीर्तनासंबंधीची आचारसंहिता या महानुभावांनी रुजवली़ त्यांच्या प्रेरणेतून शेकडो वारकरी कीर्तनकार घडले आणि गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाले़ पंढरपूरचा हरिजन मंदिरप्रवेश व बडवेमुक्त विठ्ठल मंदिराचा लढा यात वारकरी कीर्तनकारांचे योगदान मोठे असून या दोन्ही लढ्यांमध्ये ह़ भ़. प़. बाळासाहेब भारदे, वि.स. पागे, स.के. नेऊरगावकर, ह.भ.प. रामदासबुवा मनसुख, ह.भ.प. शेलारमामा, ह.भ.प. लक्ष्मणबुवा वाणी, ह.भ.प. सहदेव नथुजी खांडगे, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊसी मोरे, बाळासाहेब वरळीकर आदी मान्यवरांचे योगदान मोठे होते़

Web Title: Warkari sect promoter, Mamaasaheb Dandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.