आयुक्तांनी पत्नीसोबत रंगवल्या भिंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:22 AM2018-04-23T03:22:55+5:302018-04-23T03:22:55+5:30

उन्हातील रविवारची ही रंगपेरणी जशी झोपडपट्टीत उठून दिसत होती, तशीच ती नागरिकांच्या डोळ्यांतही प्रतिबिंबित होत होती.

The wall of the painted with the wife of the Commissioner | आयुक्तांनी पत्नीसोबत रंगवल्या भिंती

आयुक्तांनी पत्नीसोबत रंगवल्या भिंती

Next

ठाणे : रविवारची दुपार, रणरणते ऊन, डोंगरीपाडा आणि इंदिरानगर या झोपडपट्टीतून टोकाकडे जाणारा उभा कडा, रंगांच्या माध्यमातून भिंती रंगवण्यात मग्न असलेली मुले... तसेच त्यांच्यात मिसळून त्यांच्यासोबत भिंती रंगवणारे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांची पत्नी सिद्धी. उन्हातील रविवारची ही रंगपेरणी जशी झोपडपट्टीत उठून दिसत होती, तशीच ती नागरिकांच्या डोळ्यांतही प्रतिबिंबित होत होती.
या रंगपेरणीसाठी मुंबई मिसाल या संस्थेच्या अध्यक्षा रूबल नागी, स्थानिक नगरसेविका अर्चना मणेरा, माजी नगरसेवक मनोज प्रधान, साधना प्रधान, रोटरी क्लब ठाणेचे पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी उपायुक्त संदीप माळवी, ओमप्रकाश दिवटे, अशोक बुरपल्ले, सहायक आयुक्त अनुराधा बाबर, कार्यकारी अभियंता भरत भिवापूरकर, विकास ढोले, घनकचरा विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हळदेकर आदी उपस्थित होते. गेल्या आठवड्यापासून इंदिरानगर झोपडपट्टी आणि डोंगरीपाडा येथे झोपडपट्टीमध्ये रंगरंगोटी, साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. पालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या या मोहिमेचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले होते. गेले पाच दिवस ही मोहीम यशस्वीपणे सुरू असून या मोहिमेमध्ये आता स्थानिक नागरिक, मुले मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. या दोन्हीही झोपडपट्ट्यांनी आता कात टाकली असून स्थानिक नागरिकांच्या सहभागाने झोपडपट्ट्यांच्या बाह्यरूपाबरोबरच अंतर्गत रूपही पालटायला सुरुवात झाली आहे. महापालिकेसोबत आता रहिवासीही आपल्या घराच्या दारात कचरा पडणार नाही, याची दक्षता घेऊ लागले आहेत. त्याचबरोबर हे स्थानिक रहिवासी आपल्या समस्यांबाबत महापालिका आयुक्तांशी संवाद साधू लागले आहेत आणि महापालिका आयुक्त त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत असून आता या झोपड्यांमध्ये स्थानिक समस्या स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने मार्गी लागत आहेत.

पार पडली चित्रकलेची कार्यशाळा
ठाणे : हाताच्या बाह्या सावरत, चेहºयावरील गरिबीचे मळभ दूर फेकून रविवारी इंदिरानगर झोपडपट्टीतील जवळपास दीडशे मुले चित्रकला कार्यशाळा आणि स्पर्धेत सहभागी झाली. त्यांनी रविवारची सुटी चक्क महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत साजरी केली. आयुक्तही सर्व अभिनिवेश विसरून या मुलांमध्ये रममाण झाले. निमित्त होते इंदिरानगर झोपडपट्टीच्या रंगरंगोटीचे. गेल्या आठवडाभरापासून ठाणे शहरातील इंदिरानगर आणि डोंगरीपाडा येथील झोपडपट्टीमध्ये आकर्षक रंगरंगोटीसह नागरिकांमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण याविषयी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. या मोहिमेला स्थानिकांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये मिसाल संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील मुलांसाठी चित्रकला कार्यशाळा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जवळपास दीडशे मुलांनी सहभाग नोंदवला. यातील उत्कृष्ट चित्रांना महापालिका आयुक्तांच्या हस्ते गौरवण्यात आले. आयुक्तांनी खेळकर वृत्तीने या मुलांशी संवाद साधला. त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्याशी गप्पा मारल्या.

Web Title: The wall of the painted with the wife of the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.