‘शहरी जंगलां’साठी दोन लाख वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:49 PM2019-07-12T23:49:48+5:302019-07-12T23:49:53+5:30

राज्य शासनाचा उपक्रम : जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांचे तंत्रज्ञान

Two lakh trees planted for 'urban forest' | ‘शहरी जंगलां’साठी दोन लाख वृक्षांची लागवड

‘शहरी जंगलां’साठी दोन लाख वृक्षांची लागवड

googlenewsNext

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्राच्या विविध भागांमध्ये गेल्या चार वर्षांत सहा लाख वृक्षांची लागवड करण्यापाठोपाठ आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या ‘शहरी जंगले’ या संकल्पनेवर आधारित दोन लाख वृक्षलागवडीचा संकल्प केला असून यावर दोन कोटी रु पये खर्च करण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.


पर्यावरणसंवर्धन आणि हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आखले होते. या योजनेचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने गेल्या चार वर्षांत सहा लाख वृक्षलागवड केली. शहरातील मोकळे तसेच आरक्षित भूखंड, रस्ते दुतर्फा, वनविभागाचे भूखंड याठिकाणी ती केली आहे. यातील जिवंत असल्याची टक्केवारी ७९ टक्के इतकी आहे, तर गेल्या दोन वर्षांत लागवड केलेली रोपे जिवंत असल्याची टक्केवारी ८३.१२ टक्के इतकी असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. याशिवाय, खाडीकिनारी भागात मोठ्या प्रमाणात खारफुटीची लागवड केल्याचा दावाही केला आहे.


राज्य शासनाने यंदाच्या वर्षी ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचे जाहीर केले असून महापालिकेला दोन लाख वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाने सात ते आठ फूट उंचीचे स्थानिक प्रजातींचे वृक्षलागवडीचे नियोजन करून त्यासाठी जपानी वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या ‘शहरी जंगले’ या संकल्पनेचा आधार घेतला आहे. त्यानुसार या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया होईल.

अशी आहे संकल्पना... : मियावाकी जंगलांचा आकार निश्चित केल्यानंतर त्याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने तीन फूट खोदून माती काढलेला भाग एकसमान करून त्याठिकाणी शंभर लीटर जीवामृत झारीने पाणी शिंपडण्यात येते. जीवामृत हे गायीचे मलमूत्र, दूध, दही आणि तुपापासून तयार करण्यात येते. खड्ड्यांतून बाहेर काढलेल्या मातीतून दगड, विटांचे तुकड्यांसह काच आणि प्लास्टिक बाहेर काढून त्यामध्ये १५०० किलो भाताचे कुस-कोंडा, १५०० किलो कुजलेले शेणखत टाकतात.
तसेच शंभर किलो घन जीवामृत टाकून हे मिश्रण एकत्र करून ते खोदलेल्या खड्ड्यांत टाकण्यात येते. खड्डा भरत असताना प्रत्येक एक फूट उंचीवर दोनशे लीटर जीवामृत झारीने शिंपडण्यात येते. त्यावर चारशे झाडे लावून त्यांना बांबूने आधार देण्यात येतो. झाडे लावताना आतील आणि बाहेरच्या बाजूला एक फूट जागा मोकळी सोडण्यात येते. प्रत्येक झाडाला शंभर मिली जीवामृत देण्यात येते. सर्व झाडे लावल्यानंतर उसाच्या पाचरटाचा ६ इंच जाडीचा थर देऊन बाहेरून-आतून काथ्याने बांधून त्यावर जीवामृत झारीने शिंपडून ही वृक्षलागवड करण्यात येते.


या प्रजातींच्या वृक्षांची होणार लागवड : प्राजक्ता, गुंज, शेवगा, लिंबू, डाळिंब, बहावा, ताह्मण, भोकर, खैर, आंबा, कडुलिंब, बेल, अर्जुन, अंजन, कामिनी, सोनचाफा, टिकोमा, शंकासूर, बिट्टी, कणेर, हिरडा, बेहडा, अडुळसा, अनंत आणि इतर प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे.

Web Title: Two lakh trees planted for 'urban forest'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.