टीएमटीत इंजिन आॅइल घोटाळा, परिवहनच्या बैठकीत सदस्य आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 03:43 AM2018-07-18T03:43:12+5:302018-07-18T03:46:35+5:30

एसटी महामंडळाशी तुलना करता टीएमटीसाठी जादा इंधन खरेदी केल्याबाबतचे गंभीर आक्षेप ठाणे परिवहन सेवेच्या २०१५-१६ च्या लेखापरीक्षण अहवालात नोंदविले आहेत.

TMT engine engine scam, aggressive member of the transport meeting | टीएमटीत इंजिन आॅइल घोटाळा, परिवहनच्या बैठकीत सदस्य आक्रमक

टीएमटीत इंजिन आॅइल घोटाळा, परिवहनच्या बैठकीत सदस्य आक्रमक

Next

ठाणे : रस्त्यावर बस धावत नसतानाही ठाणे परिवहन सेवेतील बसला जास्तीचे इंजिन आॅइल लागल्याचा मुद्दा, तसेच उपलब्ध असलेल्या बसवर इंधन व दुरुस्ती खर्चात तब्बल ४० टक्क्यांची वाढ आणि एसटी महामंडळाशी तुलना करता टीएमटीसाठी जादा इंधन खरेदी केल्याबाबतचे गंभीर आक्षेप ठाणे परिवहन सेवेच्या २०१५-१६ च्या लेखापरीक्षण अहवालात नोंदविले आहेत. त्यातही इंजिन आॅइलच्या मुद्यावरून परिवहन समिती सदस्यांनी मंगळवारच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरून यामध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली.
टीएमटीच्या ताफ्यात ३५१ बस असल्या तरी आजघडीला केवळ ७७ बस रस्त्यावर धावत आहेत. काही वर्षांत हे प्रमाण १८० ते १९० च्या घरात होते. परंतु, ते आता अगदीच कमी झाले आहे. असे असतांना परिवहनला जास्तीचे डिझेल लागतेच कसे, जास्तीचा ४० टक्के खर्च वाढतोच कसा आणि एसटीपेक्षा जास्तीचे इंजिन आॅईल लागतेच कसे असा सवाल सदस्य राजेश मोरे यांनी केला. लेव्हल तपासून इंजिन आॅईलचे टोपिंग केले जाते. त्यानुसार रजिस्टरची तपासणी केली असता, जास्तीच्या आॅईलचा वापर केल्याचे आढळले आहे. त्यातही काही बसचेच या अनुषंगाने लेखापरिक्षण केले असून उर्वरीत बसची तपासणी केल्यास त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून येईल असा आरोपही यावेळी त्यांनी केला. त्यामुळे जे अधिकारी या आर्थिक नुकसानीस जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असेही या अहवालात नमूद केले आहे. दुसरीकडे २०१५-१६ या आर्थिक वर्षात संचलनासाठी उपलब्ध केलेल्या बसवर इंधन व दुरुस्ती खर्चात ४० टक्के वाढ झाल्याबाबतही आक्षेप नोंदविला आहे. उपलब्ध बससाठी आवश्यकतेपेक्षा तब्बल ४ लाख ८ हजार ४०० लीटर जास्तीचे डिझेल वापरल्याचे निदर्शनास आले. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत परिवहनने डिझेल खरेदीसाठी मोठा खर्च केल्याची बाबही समोर आली. एसटी महामंडळाशी तुलना करता परिवहन सेवेच्या बससाठी जादा प्रमाणात इंधन वापरले जात असल्याबाबतही गंभीर आक्षेप नोंदविला आहे. यात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करून सदस्य प्रकाश पायरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली. या प्रकरणात जे काही आक्षेप नोंदविलेले आहेत, त्याचे योग्य प्रकारे निराकरण करावे आणि त्याचा अहवाल सादर करावा अशा सूचना प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांनी प्रशासनाला केल्या.
>टीएमटीच्या जाहिरात ठेक्यात ३२.३० कोटींचा तोटा
ठाणे : उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यात टीएमटी कमी पडत असताना जाहिरातीच्या ठेक्यातदेखील तोटाच सहन करावा लागल्याची बाब समोर आली आहे. परिवहन सेवेने ४७० प्रवासी निवारे बीओटी तत्त्वावर बांधून जाहिरात प्रदर्शित करण्याचा ठेका दिला होता. यापोटी अपेक्षित उत्पन्नापेक्षा केवळ १० टक्केच उत्पन्न मिळाल्याचा मुद्दा मंगळवारच्या बैठकीत चांगलाच गाजला. त्यामुळे परिवहनला तब्बल ३२.३० कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे. २०१५-१६ चा लेखापरीक्षण अहवालात ही बाब उघड झाली आहे. ठाणे परिवहन सेवेमार्फत २००९-१० या आर्थिक वर्षात ४७० बस प्रवासी निवारे बिओटी तत्त्वावर बांधून १२ वर्षांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी मे. सोल्यूशन अ‍ॅडर्व्हटायझिंग या संस्थेस ठेका दिला होता. या संस्थेने जाहिरात कराचे उत्पन्न हे रोख स्वरुपात देण्याऐवजी परिवहन सेवेस सेमी लोअर फ्लोअर ९ बसेस दिल्या. त्यानुसार प्रस्ताव तयार करतांना ९ बसमधून प्रती दिन ७ हजार ३०० रुपये या प्रमाणे एका वर्षात २३ लाख ९८ हजार ५०० रुपये या प्रमाणे १५ व्या वर्षात ३५.९७ कोटी इतके उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, या बसमधूनकेवळ २००९ ते २०१५ पर्यंत केवळ ३ कोटी ६६ लाख ८९ हजार ४६२ रुपयांचेच उत्पन्न मिळाले आहे. त्यातही उपलब्ध झालेल्या बस या केवळ सहा वर्षच रस्त्यावर धावल्या आणि त्यानंतर त्या वागळे आगारात धूळखात पडून आहेत. एकूणच यामुळे परिवहनचे तब्बल ३२.३० कोटींचे नुकसान झाले असून ते कोण भरून देणार असा सवाल परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी केला. तर या प्रकरणी सोल्यूशन अ‍ॅडर्व्हटायझिंग कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी पदससिद्ध सदस्य राम रेपाळे यांनी केली. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करून संबधींत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे असे आदेश प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांनी प्रशासनाला दिले.

Web Title: TMT engine engine scam, aggressive member of the transport meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.