ठाणे पोलिसात दाखल होणार सात जाँबाज,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 05:31 AM2017-11-02T05:31:46+5:302017-11-02T05:31:52+5:30

Thirty seven junk, | ठाणे पोलिसात दाखल होणार सात जाँबाज,

ठाणे पोलिसात दाखल होणार सात जाँबाज,

Next

ठाणे : ठाणे पोलिसांचे हात बळकट करण्याकरिता सात जाँबाज लवकरच दलात सहभागी होणार आहेत. खून, दरोडे, घरफोड्या करणाºयांचा माग घेण्यात त्यापैकी काही तरबेज आहेत, तर स्फोटके ठेवून घातपाती कारवाया करणाºयांचे मनसुबे उधळून लावण्यात काहींचा हातखंडा आहे. हे शूरवीर दुसरे तिसरे कुणी नसून दोन जर्मन शेफर्ड, दोन डॉबरमन आणि तीन लॅब्राडोर आहेत.
राज्यातील पोलीस दलात एकूण ८१ श्वानांच्या भरतीला मंजुरी मिळाली असून त्यामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील सात नव्या श्वानांचा समावेश होणार आहे. नव्याने दाखल होणाºया सात श्वानांमुळे ठाणे शहर पोलिसांच्या श्वानपथकाचे बळ दुप्पट होणार आहे. त्यांची खरेदी प्रक्रिया सुरू असून प्रशिक्षण झाल्यानंतर ते लवकरच पोलीस दलात दाखल होतील,अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
गुन्ह्यांचा छडा लावण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे, सोशल मीडियाची मदत ठाणे पोलीस घेत असून तंत्रज्ञानाबरोबरच प्रशिक्षित श्वानांची फौज दिमतीला असल्याने गुन्ह्यांची उकल करणे सोपे होणार आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने क्षमतावाढीचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
अशी होते दलात भरती
एखाद्या श्वानाची पोलीस दलात भरती करताना त्या श्वानाचा इतिहास तपासून पाहिला जातो. यापूर्वी पोलीस दलात सेवा बजावलेल्या व कर्तबगारी दाखवलेल्या श्वानाच्या पोटी जन्मलेल्या श्वानाला सेवेत प्राधान्य दिले जाते. एकदोन महिन्यांच्या पिल्लास घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरच श्वानाची पोलीस दलात भरती होते.

असे आहे पोलिसांचे श्वानबळ
ठाणे शहर पोलीस दलात सध्या २ डॉबरमन व ५ लॅब्राडोर आहेत. नव्या ७ श्वानांमध्ये २ डॉबरमन,२ लॅब्राडोर व ३ जर्मन शेफर्ड यांचा समावेश असणार आहे.

स्फोटके आणि अमली पदार्थांचा काढतात माग
डॉबरमन हे खून,दरोडे,चोरी,घरफोडी,दंगल,अशा गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेण्यास उपयोगी पडतात. त्यांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. लॅब्राडोर हे स्फोटक पदार्थ शोधून काढतात, तर जर्मन शेफर्ड हे अमली पदार्थांचा माग काढतात.

वातानुकूलित
मोटार आणि विमा
नव्याने भरती होणाºया श्वानांसाठी वातानुकूलित गाडीखरेदी करण्यात येणार असून टाटा कंपनीने त्याच्यासाठी खास मॉडेल बनवले आहे. त्यात श्वानाची बसण्याची खास व्यवस्था केली असून पंखा लावला आहे. श्वानांचे औषधाचे कीट, जेवण याकडे लक्ष दिले जाणार आहे. नव्याने दाखल होणाºया सर्व श्वानांचा विमा काढला जाणार आहे.

‘‘श्वानखरेदी प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यावर त्यांना अगोदर प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर, २०१८ मध्ये ते पोलीस दलात दाखल होतील. त्यामुळे गुन्हे उघडकीस येण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.’’
- मकरंद रानडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर

Web Title: Thirty seven junk,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस