कर्जतमध्ये पोशीर नदीचा नाही ठाव; शासन म्हणते, धरण बांधणार राव!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 01:25 PM2024-04-12T13:25:11+5:302024-04-12T13:26:18+5:30

‘पोश्री’वरही प्रकल्प उभारण्यास शेतकऱ्यांचा विरोध

There is no river Poshir in Karjat; The government says, Rao will build a dam! | कर्जतमध्ये पोशीर नदीचा नाही ठाव; शासन म्हणते, धरण बांधणार राव!

कर्जतमध्ये पोशीर नदीचा नाही ठाव; शासन म्हणते, धरण बांधणार राव!

विजय मांडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : ठाणे जिल्ह्यातील महानगरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कर्जत तालुक्यातील पोशीर नदीवर मोठे धरण बांधण्याचे कोकण पाटबंधारे महामंडळाने जाहीर केले आहे. मात्र, पोशीर नावाची नदी येथे नसताना तिचा उल्लेख आला कसा, असा  प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. पोशीर नदी अस्तित्वात नाही,  मात्र या भागात असलेल्या पोश्री नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न झाला तरी आम्हाला धरण नको, असा पवित्रा बोरगाव आणि चई येथील शेतकरी व ग्रामस्थांनी घेतला आहे.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून कर्जत तालुक्यात धरण बांधण्याचा प्रस्ताव २०-२२ वर्षांपूर्वीचा आहे. आता मात्र महामंडळाने अधिसूचना जारी केली आहे. कर्जत तालुक्यात धरण बांधले जाणार असून, तीन गावे विस्थापित होणार आहेत. कर्जत तालुक्यात पोशीर नदी आहे कुठे?, असा प्रश्न लोकांना पडला आहे.  चिल्लार, पोश्री आणि पेज अशा तीन नद्या कर्जत तालुक्यात उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. त्यामुळे कोणत्या नदीवर धरण बांधणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या भागात धरण बांधले जाणार आहे, तेथील शेतकऱ्यांची संमती आहे का? याबाबत कोणत्याही प्रकारची सुनावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शासन स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सहमतीशिवाय पोशीर धरण बांधण्याचे धोरण कितपत योग्य आहे, असा प्रश्न बोरगावचे ग्रामस्थ सतीश पाटील यांनी केला आहे.

पोश्री नदीवर धरण बांधणार असेल तर ती भीमाशंकर अभयारण्यातील डाेंगरात उगम पावते. बेलाचीवाडी, नांदगाव अशी ही पोश्री नदी चई गावासमोरून धाबे वाडी येथून बोरगावच्या शिवारातून कळंबहून पोशीर गावाच्या बाजूने चिकनपाडा, मानिवली, खाड्याचा पाडा, अशी उल्हास नदीला जाऊन मिळते. उन्हाळ्यात ती कोरडी असते. बोरगाव, चई आणि चेवणे या गावांना विस्थापित करून धरण बांधले जाणार आहे. 

धरण कोणत्या नदीवर बांधणार, ते आधी सांगा?
आधी धरण पोशीर नदीवर बांधले जाणार आहे? हे शासनाने जाहीर करावे. तसेच पोशीर नदी कुठून, कुठे वाहते? हे शासनाने जाहीर करावे. शासनाच्या कागदावर असलेल्या पोशीर नदीवर शासनाने जरूर धरण बांधावे, अशी चर्चा आहे.

Web Title: There is no river Poshir in Karjat; The government says, Rao will build a dam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.