ठाणेकरांनो मोफत वायफायसाठी ५ दिवसानंतर मोजा पैसे, प्रायोगिक तत्त्वावर झाली दोन लाख ग्राहकांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 05:33 PM2018-01-09T17:33:42+5:302018-01-09T17:37:42+5:30

दोन लाख ग्राहकांनी ठाणे महापालिकेच्या प्रायोगिक तत्वावरील मोफत वायफाय सेवेचा फायदा घेतल्यानंतर आता खऱ्या अर्थाने ही सेवा पुढील पाच दिवसात प्रत्यक्षात सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार ही सेवा हवी असल्यास ठाणेकरांना पैसे मोजावे लागणार आहेत.

Thane corporation registers two lakh subscribers on experimental basis after 5 days for free wifi | ठाणेकरांनो मोफत वायफायसाठी ५ दिवसानंतर मोजा पैसे, प्रायोगिक तत्त्वावर झाली दोन लाख ग्राहकांची नोंदणी

ठाणेकरांनो मोफत वायफायसाठी ५ दिवसानंतर मोजा पैसे, प्रायोगिक तत्त्वावर झाली दोन लाख ग्राहकांची नोंदणी

Next
ठळक मुद्देठेकेदाराबरोबर पालिका उघडणार एस्क्रो अकाऊंट८०० केबीपीएसनंतरचे दर मात्र गुलदस्त्यात

ठाणे : ठाणे शहर वायफायने कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली असून स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून आता संपूर्ण शहर हे वायफायने कनेक्ट केले जाणार आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या सेवेअंतर्गत आतापर्यंत दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. परंतु, आता या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढील चार दिवसानंतर ठाणेकरांना पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, ही सेवा मार्केट रेटपेक्षा कमी दरात उपलब्ध असेल असा दावा महापालिकेने केला असला तरी हे दर किती असतील हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.
महापालिकेमार्फत वायफायचा हा प्रकल्प पीपीपी म्हणजेच खाजगी लोकसहभगातून राबविला जात आहे. त्यामुळे यासाठी पालिकेला एकही पैसा खर्च न करता, उलट खाजगी ठेकदाराकडून पालिकेला वार्षिक ६१ लाख ९९ हजार ९९९ रुपयांचा आर्थिक फायदा होणार आहे. स्मार्टसिटी एक भाग म्हणून आणि ठाणेकरांना इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी मागील वर्षी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हे पाऊल उचलले होते. वायफायची यंत्रणा बसविण्यासाठी महापालिकेच्या ३२ हजार ५०० विद्युत पोलचा वापर केला जात आहे. वायफाय सिस्टममध्ये महापालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नसून महापालिका संबधींत एजेन्सीला विद्युत पोल उपलब्ध करुन देणार आहे. त्यानुसार ज्यांना या वायफायची सुविधा घ्यायची असेल त्यांना सुरुवातीला १०० रुपये तेही एकदाच मोजावे लागणार आहेत. यामध्ये ८०० केबीपीएसपर्यंत इंटरनेट मोफतअसून त्यापुढील वापरासाठी चार्जेस द्यावे लागणार आहेत. यातून जे उत्पन्न मिळणार आहे. त्यातील १४.२३ टक्के हिस्सा अथवा ६१ लाख ९९ हजार ९९९ रुपये हा पालिकेला मिळणार आहेत. त्यानुसार मागील काही महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा मोफत दिली असून आतापर्यंत २ लाख ठाणेकरांनी याचा फायदा घेतल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
परंतु आतापुढील चार दिवसानंतर महापालिका संबधींत ठेकेदाराबरोबर एस्क्रो अकाऊंट ओपन करणार आहे. त्यावर महापालिकेचे हक्क असणार आहेत. म्हणजेच जे ग्राहक या वायफाय सेवेचा लाभ घेणार आहेत. त्याची नोंदणी या अकाऊंटमधून होणार आहे. तसेच येणारे पैसेदेखील याच अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर संबधींत ठेकेदाराला त्याचा हिस्सा देणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार हे अकाऊंट ओपन झाल्यानंतर येत्या चार ते पाच दिवसात प्रत्यक्षात या सेवेला सुरुवात होणार असून ग्राहकांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच नवे प्लॅनही जाहीर केले जाणार आहेत. परंतु, हे प्लॅन अद्यापही गुलदस्त्यातच ठेवले आहेत. त्यामुळे ८०० केबीपीएसनंतर ठाणेकरांच्या खिशाला किती भुर्दंड पडणार हे मात्र अद्यापही निश्चित झालेले नाही. असे असले तरी ही सेवा मार्केटमधील इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी दर आकारणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.



 

Web Title: Thane corporation registers two lakh subscribers on experimental basis after 5 days for free wifi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.