The Fizibility Report of Metro under Thane will be presented next week, with a barely three month report prepared | ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोचा फिजीबीलीटी अहवाल पुढील आठवड्यात होणार सादर, अवघ्यात तीन महिन्यात अहवाल तयार

ठळक मुद्देअहवाल महासभेच्या पटलावर ठेवण्याच्या तयारीत प्रशासनप्रस्तावित नव्या रेल्वे स्थानकालाही जोडली जाणार


ठाणे - भविष्यात हायवे टू हायवे धावणारी मेट्रो ठाणेकर पाहण्याआधीच अंतर्गत मेट्रोचा आनंद मात्र ठाणेकर मंडळी आधीच घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या फीजीबीलीटी अहवालासाठी वर्षभराचा कालावधी जातो तो अहवाल अवघ्या तीन महिन्यात तयार झाला असून तो पुढील आठवड्यात महामेट्रो मार्फत पालिकेला सादर केला जाणार आहे. त्यानुसार अंतर्गत वाहतुकीच्या दृष्टीकोणातून ठाणेकरांना या अंतर्गत मेट्रोचा फायदा होणार आहे. हा प्रकल्प लाईट रेल ट्रान्झीट प्रकल्प म्हणून ओळखला जाणार आहे. याचा फायदा वागळे, लोकमान्य नगर, पोखरण १, २ व मानपाडा आदी भागांसाठी होणार आहे.
          ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने एचसीएमटीआर ( हाय कॅपेसिटी मास ट्रान्सपोर्ट रुट) चा मार्ग शहरात १९९९ मध्ये मंजूर केला आहे. रिंग रुट पध्दतीने या मार्गावरुन प्रवास केल्यास शहरातील कोणत्याही भागात प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार आहे. या रुट्ससाठी आतापर्यंत महापालिकेच्या ताब्यात सुमारे नऊ हेक्टर जमीन आली आहे. तर सुमारे साडेसहा हजार हेक्टर जमीनीवर अतिक्र मण आहे. शिवाय काही ठिकाणी सीआरझेडचा अडथळा आहे. परंतु मार्ग निश्चित करण्यात आल्याने प्रवासासाठी नक्की कोणते साधन योग्य ठरणार याचा निर्णय झाल्यानंतर या मार्गावर काम करणे महापालिकेला शक्य होणार आहे. त्यानुसार आता अंतर्गत मेट्रोचा पर्याय पुढे आला आहे. महासभेची देखील आता मंजुरी घेण्यात आली असून महामेट्रो कंपनीकडून सर्व्हेचे काम सुरु झाले आहे. त्यानुसार आता फीजीबीलीट अहवाल आता अंतिम टप्यात आला असून तो पुढील आठवड्यात ठाणे महापालिकेला सादर केला जाणार आहे. या अहवालावरच ही अंतर्गत मेट्रो कितपत किफायतशीर आहे, याची माहिती होणार आहे. त्यानंतर लागलीच हा अहवाल महासभेच्या मान्यतेसाठी पटलावर ठेवला जाण्याची शक्यता असल्याचे पालिकेचे म्हणने आहे.
शहराच्या अंतर्गत प्रवासासाठी मेट्रो चालविण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत, खर्च, कालावधी, त्यामूळे किती वेगाने किती प्रवाशांची वाहतूक शक्य होईल याचा अहवाल त्यानंतर सादर केला जाणार आहे. शहरातील एचसीएमटीआरच्या मार्गावरु न नक्की कोणत्या वाहनातून प्रवास करायचा याचा निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. त्यामूळेच आरक्षण असलेल्या या जागेवर कोणतेही काम सुरु करण्यात आलेले नाही. अशावेळी महामेट्रो कंपनीच्या वतीने महापालिकेला किफायतशीर असा सर्व्हे मिळाल्यास भविष्यात ठाणेकरांना मेट्रोचा किफायतशीर प्रवासाची हमी मिळण्याची दाट शक्यता आहे. या सर्व्हेसाठी ३ कोटी ५४ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागातील पादचारी पुल - सबवे या लेखाशिर्षाकामधून वर्ग करण्यात येणार आहे. या अहवालानुसार कोणत्या ठिकाणी किती बांधकामे बाधीत होणार आहेत, कोणत्या ठिकाणी आरक्षण बदलण्याची गरज आहे, आदींसह इतर माहिती मिळणार आहे. त्यानुसारच पुढील धोरण ठरविले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दरम्यान अंतर्गत मेट्रो सेवेचा शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, पोखरण १, २ व मानपाडा आदी भागांना फायदा होणार आहे. या भागातील लोकवस्ती वाढत असल्याने त्यांना या किफायतशीर वाहतुकीचा फायदा होणार आहे. शिवाय प्रस्तावित मनोरुग्णालयाजवळील नवीन रेल्वे स्थानकाला हा मार्ग जोडता येणे शक्य असल्याने ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.