आयआयटीकडून पत्रीपुलाची पुन्हा एकदा चाचणी करा; पालकमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 01:04 AM2018-08-24T01:04:12+5:302018-08-24T01:04:53+5:30

आवश्यक ती डागडुजी करून काही दिवसांनी पूल पाडण्यास हरकत नसेल, तर त्यादृष्टीने पावले उचलण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले

Test IIT's letter again; Guardian Minister's Order | आयआयटीकडून पत्रीपुलाची पुन्हा एकदा चाचणी करा; पालकमंत्र्यांचे आदेश

आयआयटीकडून पत्रीपुलाची पुन्हा एकदा चाचणी करा; पालकमंत्र्यांचे आदेश

Next

डोंबिवली : कल्याण येथील ब्रिटिशकालीन पत्रीपुलावरून हलकी वाहने जाऊ शकतात की नाही, यासंदर्भात तातडीने आयआयटीच्या अभियंत्यांशी चर्चा करून फिजिबिलिटी अहवाल पुन्हा एकदा घेण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी एमएसआरडीसीला दिले. आवश्यक ती डागडुजी करून काही दिवसांनी पूल पाडण्यास हरकत नसेल, तर त्यादृष्टीने पावले उचलण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासन हा पूल शुक्रवारी पाडणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झालेला असतानाच पूल पाडण्याचे काम शनिवारपासून सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सवापूर्वी पत्रीपूल पाडल्यास त्यामुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या निर्माण होईल. दहीहंडीसह गणेशोत्सवावरही या पाडकामाचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून महापौर विनीता राणे, विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे आदींनी पालकमंत्री एकनाथ शिंदेंची गुुरुवारी वेळ घेतली होती. त्यानुसार, मंत्रालयात दुपारी २ ते ४ या वेळेत त्यांची पालकमंत्र्यांसोबत या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली.
मुंब्रा बायपाससाठी १० सप्टेंबरची डेडलाइन ठरवण्यात आली आहे. मुंब्रा बायपास सुरू झाल्यानंतर पत्रीपुलाचे काम तातडीने हाती घेण्यास हरकत नाही. तोपर्यंत पत्रीपुलाची तातडीची डागडुजी करून कल्याण-डोंबिवलीकरांची गैरसोय दूर करावी, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार आयआयटीच्या तज्ज्ञांसमवेत तातडीने चर्चा केली जाईल, असे एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अभियंत्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांंच्या मध्यस्थीमुळे या समस्येतून निश्चितच सुवर्णमध्य निघेल, काही ना काही तोडगा निघेल, असा विश्वास विश्वनाथ राणे यांनी व्यक्त केला.
मध्य रेल्वे प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात या पुलासंदर्भात पत्र दिले होते. हा पूल हलक्या वाहनांसाठी निश्चितच चालेल. मात्र, अवजड वाहनांची वाहतूक बंद करा, असे या पत्रात म्हटले होते. असे असतानाही अंधेरी आणि लोअर परेल येथे घडलेल्या पादचारी, उड्डाणपुलांच्या काही दुर्घटनांची धास्ती घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे का, असा सवाल नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार पुलाची डागडुजी करावी. वाहतुकीसाठी पूल सुरू ठेवून वाहतूककोंडी सोडवावी, अशी मागणीही म्हात्रे यांनी यावेळी केली.

शनिवारपासून पाडकाम
पालकमंत्र्यांनी पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक होऊ शकते की नाही, याबाबत आयआयटीकडून अहवाल मागविण्याचे आदेश दिले असले तरी, मध्य रेल्वेने मात्र पुलाचे पाडकाम शनिवारपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Web Title: Test IIT's letter again; Guardian Minister's Order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण