Suggest names to scheduled metro stations in the city | शहरातील नियोजित मेट्रो स्थानकांना नावे सुचवा

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रोमार्गातील नऊ स्थानकांना नावे सुचवण्याचे आवाहन महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना केले आहे. यावर उद्याच्या महासभेत चर्चा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
नियोजित मेट्रोमार्ग दहिसर चेकनाका येथून विस्तारित करण्यात येणार असून त्यासाठी नऊ स्थानके निश्चित केली आहेत. मात्र, त्यांची नावे अद्याप निश्चित झालेली नसल्याने त्यांना सर्वानुमते मान्य ठरणारी नावेच देण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे.
या नियोजित नऊ मेट्रो स्थानकांत राष्टÑीय महामार्ग (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) क्रमांक ८ वरील दहिसर चेकनाका परिसरातील पांडुरंगवाडी व अमर पॅलेस हॉटेल परिसरात दोन स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. भार्इंदर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गावर ५ स्थानके असून त्यात काशिमीरा वाहतूक बेटाजवळच्या झंकार कंपनी, मीरा रोड येथील साईबाबानगर, दीपक हॉस्पिटल, गोल्डन नेस्ट या बायपास मार्गावरील क्रीडासंकुल व इंद्रलोक या परिसरांचा समावेश आहे. भार्इंदर पश्चिमेकडे २ स्थानके प्रस्तावित असून त्यात मॅक्सस मॉल व नेताजी सुभाषचंद्र मैदान परिसराचा समावेश आहे. सुरुवातीला नियोजित मेट्रोमार्ग काशिमीरा वाहतूक बेटाहून छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर प्रस्तावित करण्यात आला होता. तो तत्कालीन महासभेच्या मान्यतेनंतर भार्इंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व पूर्वेकडील इंद्रलोकपर्यंत विस्तारित केला. या नियोजित मार्गाच्या पाहणीसाठी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान व अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्या शिष्टमंडळाने शहराला भेट देत मेट्रोच्या कारशेडसह स्थानकांच्या जागांची पाहणी केली होती. त्यात ९ मेट्रो स्थानकांच्या जागा निश्चित केल्या आहेत. त्याचा रीतसर ठराव महासभेत मंजूर करून पाठवण्याची सूचना पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना एमएमआरडीएने पत्राद्वारे केली आहे.

भाजपा गटनेत्यांनी नावे सुचवली
महापौरांनी शिवसेना व काँग्रेस सदस्यांनीही त्या स्थानकांना नावे सुचवावी, असे आवाहन केले आहे. तत्पूर्वी भाजपाचे सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी नियोजित मेट्रो स्थानकांना शहरातील प्रमुख गावांची नावे देण्याची मागणी महापौर व आयुक्त यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.