सुरक्षारक्षकांची परवड थांबता थांबेना!

By admin | Published: February 7, 2017 03:54 AM2017-02-07T03:54:43+5:302017-02-07T03:54:43+5:30

कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरू केलेली बायोमेट्रीक हजेरी प्रणाली येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Stoppers stalled! | सुरक्षारक्षकांची परवड थांबता थांबेना!

सुरक्षारक्षकांची परवड थांबता थांबेना!

Next

कल्याण : कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरू केलेली बायोमेट्रीक हजेरी प्रणाली येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या प्रणालीत सुविधा नसल्याने कामावर हजर राहूनही बायोमेट्रीकमध्ये गैरहजर म्हणून नोंद झाली आहे. ही घटना ताजी असताना आता रात्रपाळीतील सुरक्षारक्षकांना ड्युटी संपण्यापूर्वीच पंचिंग करण्याची सक्ती केली जात आहे. बायोमेट्रीक पंचिंग मशीन काही ठिकाणी दूर असल्याने तेथे जाण्यासाठी लागणारा कालावधी पाहता या वेळेतील सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल केला जात आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी २००६ मध्ये तत्कालीन आयुक्त आर.डी. शिंदे यांनी बायोमेट्रीक हजेरी सुरू केली होती. परंतु, कर्मचाऱ्यांनी या यंत्राला सिगारेटचे चटके, टोकदार साधनांनी ते नादुरुस्त करणे, सुटी नाणी टाकणे, असा प्रताप करून ही यंत्रे नादुरुस्त केली. त्यानंतर, आता आयुक्त ई. रवींद्रन यांनी पुन्हा बायोमेट्रीक हजेरी प्रणाली सुरू केली आहे. महापालिका मुख्यालय, सर्व प्रभाग कार्यालये, रुग्णालये, शाळा, अग्निशमन केंद्रे येथे ही प्रणाली बसवण्यात आली आहे. बायोमेट्रीक यंत्रातील हजेरीच्या नोंदीवर मासिक वेतन निघत आहे. मात्र, ही प्रणाली सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरली आहे.
सुरक्षारक्षकांना कराव्या लागत असलेल्या शिफ्ट आणि त्यानंतर कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त कामांची नोंद या प्रणालीत होत नाही. त्याचा फटका सुरक्षारक्षक व अधिकाऱ्यांना बसला आहे. ते इमानेइतबारे काम करत असताना अनेक दिवस गैरहजर असल्याची नोंद प्रणालीत झाल्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. त्यानंतर, आतारात्रपाळीतील सुरक्षारक्षकांना ड्युटी संपण्यापूर्वी पंचिंगची सक्ती करण्यात आली आहे. रात्रपाळीतील सुरक्षारक्षकांची ड्युटी रात्री १० ते सकाळी ६ असते. कामावर हजर होताना रात्री १० वाजता पंचिंग केल्यानंतर सकाळी ६ वाजता ड्युटी संपण्यापूर्वी म्हणजेच पहाटे ५.५० ते ५.५५ दरम्यान बायोमेट्रीक हजेरी केंद्रावर जाऊन पंचिंग करावे, असा आदेश नुकताच काढण्यात आला. मात्र, हा आदेश त्यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरत आहे.
शहरांतील स्मशानभूमी, रुग्णालये आणि प्रभाग कार्यालये येथे सहसा सुरक्षा पुरवली जाते. परंतु, काही ठिकाणे ही बायोमेट्रीक हजेरी केंद्रापासून दूर आहेत. त्यामुळे ड्युटी संपण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या कामाचे ठिकाण सोडून हजेरी केंद्रावर धाव घ्यावी लागणार आहे. या काळात तेथील सुरक्षा कोणी पाहायची, असा यक्षप्रश्न संबंधितांना पडला आहे. यासंदर्भात सहायक सुरक्षा अधिकारी सुहास खेर यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात बदल करण्याच्या सूचना संगणक विभागाला केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Stoppers stalled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.