शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यात आल्याने विजय झाला सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:49 PM2019-05-30T22:49:41+5:302019-05-30T22:50:18+5:30

मोदीलाटेचाही झाला फायदा : कपिल पाटील यांच्या मताधिक्यात वाढ , पालकमंत्र्यांचे परिस्थितीवर होते जातीने लक्ष, मुस्लिमांची मतेही भाजपच्या पारड्यात

Sivasankar's anger was overcome and Sukar was victorious | शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यात आल्याने विजय झाला सुकर

शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यात आल्याने विजय झाला सुकर

Next

मुरलीधर भवार

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात नाराजी होती. ही नाराजी स्वपक्षातील नव्हे, तर शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची होती. ही नाराजी दूर झाल्याने आणि पुन्हा मोदीलाटेत त्यांना भरभरून मते मिळाल्याने पाटील पुन्हा खासदारपदी निवडून आले. मुरबाड मतदारसंघापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मते कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पाटील यांना मिळाली. त्यामुळे पाटील यांचे मताधिक्य वाढले आहे.

२०१४ मध्ये देशात मोदीलाट होती. या लाटेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले पाटील हे पहिल्यांदा दिल्लीत गेले. मागच्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ९७ हजार ६१७ मते मिळाली होती. सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुका शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढवल्या. त्यानंतर, पुन्हा दोघे एकत्र आले. मात्र, चार वर्षे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानली. लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार, असे वाटत असताना ते पुन्हा एकत्र आले. त्यामुळे या पक्षांतील कार्यकर्त्यांची मने कशी जुळणार, हा प्रश्न होता. कार्यकर्ता मेळाव्यात शिवसैनिकांनी जाहीर नाराजी व्यक्त करून त्याची प्रचीती दिली. मात्र, ही नाराजी दूर करून पाटील यांना दीड ते दोन लाखांचे मताधिक्य कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देण्याची ग्वाही शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी दिली. या विधानसभा मतदारसंघातून पाटील यांना एक लाख १७ हजार ४४० मते मिळाली. २०१४ च्या तुलनेत पाटील यांंचे मताधिक्य १९ हजार मतांनी वाढले आहे. दीड ते दोन लाखांचे मताधिक्य देण्याचा दावा फोल ठरला असला, तरी शिवसेनेच्या साथीनेच हा विजय सुकर झाला, हे निश्चित. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. भिवंडी लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सगळ्यात जास्त मते मुरबाड मतदारसंघातून, तर त्यापाठोपाठ कल्याण पश्चिमेतून सर्वाधिक मते पाटील यांना मिळाली.

पाटील यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे सुरेश टावरे यांना ४९ हजार ३८५ मते मिळाली. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी विश्वनाथ यांना ३१ हजार ६३५ मते मिळाली होती. विश्वनाथ यांच्या तुलनेत टावरे यांना मिळालेली मते पाहता काँग्रेसचे मताधिक्य वाढले. मात्र, कपिल पाटील यांचा विजय रोखता आला नाही. २०१९ मध्ये काँग्रेसची जवळपास १८ हजार मते वाढली आहेत. काँग्रेसला मनसेची साथ होती. मनसेनेही टावरे यांचे काम केले. त्यामुळे काँग्रेसचे मताधिक्य वाढले. काँग्रेसची मदार कल्याण पश्चिमेतील मुस्लिम मोहल्ल्यावर होती, मात्र बहुतांश मुस्लिम मोहल्ल्यातील मतदारांनी पुन्हा भाजपला पसंती दिली. २०१४ च्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी काँग्रेसने आमची वर्षानुवर्षे फसवणूक केल्याने भाजपला मतदान करण्याचे जाहीर केले होते. यावेळेस तीन तलाकच्या मुद्द्यावर मुस्लिम मतदार भाजपच्या बाजूने फिरला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मनसेचे बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. त्यांनी कपिल पाटील यांना मदत न करण्याची भूमिका सुरुवातीपासून घेतली होती. त्यामुळे त्यांच्या बंडाचा फायदा टावरे यांना होईल, असे बोलले जात होते; मात्र टावरे यांना मामाच्या बंडाचा फायदा झाला नाही.

वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अरुण सावंत यांना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून १५ हजार २८९ मते मिळाली. निवडणुकीपूर्वी कल्याण पश्चिमेत प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांची प्रचारसभा झाली होती. कल्याण पश्चिमेतील बहुजन समाज व मुस्लिमांची मते वंचित आघाडीकडे वळली नाहीत.

या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणाम
लोकसभा निवडणुकीत पाटील यांच्या विजयासाठी कंबर कसण्याचे आश्वासन देत शिवसैनिकांनी काम केले खरे. मात्र, सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम विधानसभेवर शिवसैनिकांनी दावा ठोकला आहे. सध्या भाजपचे नरेंद्र पवार हे आमदार आहेत. शिवसैनिकांनी कल्याण पश्चिमेचा मतदारसंघ मागितल्यास त्यावरून भाजप-शिवसेनेत पुन्हा कलह निर्माण होऊ शकतो. हा कलह पाटील व युतीसमोर आव्हान निर्माण करणारा ठरणार आहे. लोकसभेला मदत केली असली, तरी पुन्हा विधानसभेला मदत करणार नाही, या पवित्र्यात शिवसैनिक आहेत.
 

Web Title: Sivasankar's anger was overcome and Sukar was victorious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.