साधा आहार ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली, 100 वर्षात पदार्पण केल्याबद्दल विद्यार्थी करणार सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:47 AM2019-05-31T00:47:02+5:302019-05-31T00:47:31+5:30

वेदमूर्ती केशव भगत : वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण, विद्यार्थी करणार सत्कार

The simple diet is the key to a healthy life, the felicitation of the students for making 100 years of debut | साधा आहार ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली, 100 वर्षात पदार्पण केल्याबद्दल विद्यार्थी करणार सत्कार

साधा आहार ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली, 100 वर्षात पदार्पण केल्याबद्दल विद्यार्थी करणार सत्कार

googlenewsNext

जान्हवी मोर्ये 

डोंबिवली : वाढती स्पर्धा, त्यातून होणारी रोजची दगदग, संतुलित आहाराकडे होणारे दुर्लक्ष यामुळे माणसाच्या आयुर्मानात कमालीची घट झाली आहे. अशा वातावरणातही काही जण वयाची शंभरी साजरी करतात, तेव्हा थोडेसे कुतूहलच वाटते. डोंबिवलीतील वेदमूर्ती केशव भगत यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. आपली तंदुरुस्ती आणि वाढलेल्या आयुर्मानाचे श्रेय त्यांनी योगासने आणि साधा आहार यांना दिले आहे. हीच आपल्या निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात येणार आहे.

भगत यांचे बालपण खामगावजवळील एका खेडेगावात गेले. त्यांचे सातवीपर्यंतचे शालेय शिक्षणही गावातच झाले. त्यानंतर, ते इंदूरला गेले. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यांनी माधुकरी मागून शिक्षण घेतले. त्यांचे वडील हे भिक्षुकी आणि शेतीची कामे करत असत. त्यांना पाच भावंडे होती. वडील पूजापाठ करत असल्याने वेदमूर्तीचे धडे त्यांनी घरातच गिरवले. इंदूरला गेल्यावर त्यांनी काव्यतीर्थ ही संस्कृतची परीक्षा दिली. बंगाल संस्कृत असोसिएशन कलकत्ता यांनी त्यांना ‘काव्यतीर्थ’ ही पदवी बहाल केली. इंग्रजीची परीक्षा आणि त्यानंतर अकरावी मॅट्रिकचे शिक्षण त्यांनी घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर काहीकाळ त्यांनी होळकर संस्थानात नोकरी केली. चाळीसगाव येथे त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. चाळीसगावात ते १९८३ पर्यंत सातवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना संस्कृत विषय शिकवत होते. शिक्षकीपेशातून निवृत्त झाल्यावर त्यांनी डोंबिवली गाठली. १९८५ मध्ये त्यांनी संस्कृत या विषयाचे विद्यादान करण्याचे काम हाती घेतले. काही विद्यार्थी त्यांच्याकडे संस्कृतचे धडे गिरवण्यासाठी येऊ लागले. कोणतीही ‘फी’ न घेता त्यांनी हे विद्यादानाचे काम केले. सात ते आठ वर्षे विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवले. सध्या त्यांनी हे काम बंद केले. वडिलांमुळे वेदमूर्तीचे धडे त्यांनी गिरवले होते आणि संस्कृतचा गाढा अभ्यास यामुळे डोंबिवलीत ते पूजापाठ करत होते. यज्ञयाग करत होते. सध्या डोंबिवलीत ते रामचंद्रनगर येथे वास्तव्यास आहेत.
योगासनाचे ज्ञान त्यांनी स्वत:पुरते मर्यादित न ठेवता इतरांनाही योगासने शिकवली. भगत हे सकाळी वरणभात, भाजीपोळी यांचे सेवन करतात, तर सायंकाळी भाजीभाकरी घेतात. सायंकाळच्या वेळात चालण्याचा नित्यनियम पाळतात. दररोज शरीराला झेपेल एवढे ते चालतात. विद्यार्थ्यांनी माझा सत्कार करणे मला योग्य वाटत नाही, पण त्यांच्या इच्छेखातर मी तयार झालो,असे त्यांनी सांगितले.

उत्तम खेळाडू म्हणून ओळख
शालेय जीवनात उत्तम खेळाडू अशी भगत यांची ओळख होती. कबड्डी, व्हॉलिबॉल या खेळांत त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. त्याकाळात शरीरयष्टीच्या दृष्टीने खेळांकडे पाहिले जात होते. चाळीसगावात शिक्षक असताना त्यांनी योगासनांचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर, त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत योगासने करण्याचा नियम कधीही मोडला नाही. डॉक्टरांनी आता योगासने करू नये, असा सल्ला दिल्याने ते सध्या ती करत नाही.

Web Title: The simple diet is the key to a healthy life, the felicitation of the students for making 100 years of debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.